विमान अपघातानंतर कोणत्या सीटवर बसलेले प्रवाशी वाचण्याची असते शक्यता?
अनेकजण प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी विमानाने जाण्याचा पर्याय निवडतात. पण विमान अपघातानंतर कोणत्या सीटवर बसलेले प्रवाशी वाचण्याची शक्यता असते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या...

अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याची बातमी समोर येत आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळले असून, त्यात 242 प्रवासी होते. या अपघाताच्या भीषण आणि भयावह छायाचित्रांमध्ये धुराचे लोट आकाशात दिसत आहेत. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. विमान अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो की, विमानात कोणती सीट बुक करावी जी सर्वात सुरक्षित असेल. चला, जाणून घेऊया की विमान अपघातात कोणत्या जागी बसलेल्या प्रवाशांना वाचण्याची जास्त शक्यता असते.
विमानाच्या मागील बाजूस बसणे जास्त सुरक्षित?
बर्याच प्रवाशांना विमानाच्या शेवटच्या रांगेत बसण्याचा विचार आवडत नाही. विशेषतः मधल्या सीटवर बसणे तर आणखी नापसंत असते. टाइम मासिकाने 2015 मध्ये केलेल्या एका अभ्यासात गेल्या 35 वर्षांतील विमान अपघातांच्या डेटाचे विश्लेषण केले. या अभ्यासात असे दिसून आले की, विमान अपघातांमध्ये मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांचा मृत्यूदर कमी होता. अभ्यासानुसार, विमानाच्या मागील भागातील सीट्सवर मृत्यूदर 32 टक्के होता, तर मधल्या भागात 39 टक्के आणि पुढील तिसर्या भागात 38 टक्के होता.
वाचा: इंजिन खराब की इमारतीला धडकलं?; 242 प्रवाशी घेऊन निघताच 15 मिनिटात कसं झालं विमान क्रॅश?
क्रॅश टेस्ट डमीचे निष्कर्षही समर्थन देतात
एप्रिल 2012 मध्ये, एका टेलिव्हिजन स्टुडिओच्या पथकाने मेक्सिकोमध्ये विमान अपघाताचे प्रात्यक्षिक दाखवले होते. या चाचणीच्या निष्कर्षांनुसार, विमानाच्या पुढील भागात बसलेले प्रवासी अपघातात सर्वाधिक धोक्यात असतात. याउलट, विमानाच्या पंखांजवळ बसलेल्या प्रवाशांना वाचण्यायोग्य जखमा झाल्याचे आढळले. विमानाच्या मागील भागातील (टेल सेक्शन) चाचणी डमी मोठ्या प्रमाणात अखंड राहिल्या, त्यामुळे त्या भागात बसलेले बहुतेक प्रवासी गंभीर जखमांशिवाय वाचले असते. त्यामुळे विमानात शेवटच्या सीटवर बसणे सुरक्षीत असते असे म्हणणे योग्य ठरेल.
अहमदाबादमधील एअर इंडियाचे विमान कोसळले
अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर 15 मिनिटात विमान दुर्घटना झाली आहे. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची माहिती समोर आलेली नाही. पण या विमानात 116 भारतीय होते.
