
Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार, नरेंद्र मोदी, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणे आणखी एक नाव चर्चेत होत, ते म्हणजे प्रशांत किशोर. पीके म्हणून ते प्रसिद्ध आहेत. भारतातील यशस्वी राजकीय रणनितीकार अशी त्यांची ओळख आहे. प्रशांत किशोर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जन सुराज नावाचा पक्ष स्थापन केली. यंदाची बिहार विधानसभा निवडणूक त्यांनी पूर्ण ताकदीने लढवली. जन सुराज पार्टीने सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्यांच्या काही उमेदवारांनी निवडणुकीच मैदान सोडलं. त्यामुळे त्यांनी 240 जागांवर निवडणूक लढवली. आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आहेत. मतदारांनी त्यांच्या नव्या पक्षाला नाकारल्याच दिसत आहे. प्रशात किशोर यांची बिहार निवडणुकीत पिछेहाट का झाली? ते पाच पॉइंटमधून समजून घेऊया.
जन सुराज पार्टी नवीन आहे. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा लगेच पाठिंबा मिळाला नाही. संघटनात्मक बाजू कमकुवत आहे. ग्रामीण भागात मर्यादीत नेटवर्क आणि सत्ताधारी पक्षांचा दबाव हे प्रशांत किशोर यांची जादू न चालण्याचं एक कारण आहे.
पहिलं कारण
बिहारमधील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण आहे. जन सुराज पार्टी अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकलेली नाही. ग्रामीण मतदारांना जन सुराज पार्टीच निवडणूक चिन्ह आणि उमेदवार माहित नव्हते. त्यामुळे तळागाळातील मत त्यांना मिळाली नाहीत. प्रशांत किशोर यांनी बिहार पिंजून काढला. पण त्यांना अजून बरच काम करावं लागेल.
दुसरं कारण
जन सुराजने पारंपारिक पक्षांच्या रचनेऐवजी चेहरा ब्रांडिंग म्हणजे प्रशांत किशोर आणि पेड वर्करच्या नेटवर्कवर भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसला. अनेक अनुभवी आणि संस्थापक कार्यकर्त्यांना तिकीटं मिळाली नाहीत. पॅराशूट लँडिंग म्हणजे अचानक प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना तिकीटं मिळाली. तिकीट न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याला प्रशांत किशोर यांनी कुटुंबातला विषय असल्याच म्हटलं. माजी आयपीएस आनंद मिश्रा सारख्या लोकांनी पार्ची सोडली. त्यातून अंतर्गत मुद्दे आणि धुसफूस स्पष्ट होते.
तिसरं कारण
बिहारच राजकारण जाती आणि धर्माच्या मजबूत समीकरणावर आधारित आहे. जन सुराजने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या विषयावर लक्ष केंद्रीत करत पारंपारिक राजकारणाता बगल देण्याचा प्रयत्न केला. जातीय समीकरणाशी बांधलेले मतदार खासकरुन मुस्लिम मतदारांनी भाजपला हरवण्यासाठी जन सुराज पार्टी ऐवजी राजद, काँग्रेसची निवड केली. कारण हा सुरक्षित पर्याय त्यांना वाटला.
चौथं कारण
प्रशांत किशोर यांनी सार्वजनिकरित्या भाजपवर आरोप केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्या उमेदवारांवना धमकावल जातय, त्यांना प्रलोभनं दिली जात असल्याचा आरोप केला. काही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पक्षाच्या निवडणूक मोमेंटमला धक्का बसला. सत्ताधारी नव्या पक्षाला दाबण्यात यशस्वी ठरला असा संदेश त्यातून गेला.
पाचवं कारण
प्रशांत किशोर स्वत: निवडणूक लढले नाहीत. पक्षाचा ते सर्वात मोठा ब्रांड, चेहरा होते. राजकीय रणनिती आणि जनहित लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. निवडणूक न लढवल्यामुळे पक्षाचं यश केवळ व्यक्तिगत विश्वसनीयतेवर आधारित आहे असा संकेत गेला. पारंपारिक राजकारणात मोठ्या नेत्याने निवडणूक लढणं हा आत्मविश्वास मानला जातो. आता त्यांनी निवडणूक लढवली तर ते एका ठिकाणी अडकून पडणार. दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला जाता येणार नाही असाही तर्क दिला जाऊ शकतो. पण मोदींपासून शरद पवारांपर्यंत मोठे नेते नेहमी निवडणूक लढले आहेत.