
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांना आता नोएडा पोलिसांनीही उत्तर दिलं आहे. सीमा हैदरच्या पाकिस्तानात परतण्याबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून जो आदेश येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.
सीमा हैदर यांचे वकील एपी सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणात केंद्र सरकार आणि यूपी पोलिसांकडून सीमाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की, सीमा सध्या कोर्टाच्या आदेशानुसार रबूपुरा गावात राहत आहे. त्यांनी असंही सांगितलं की, सीमा हैदर प्रकरणाची चौकशी यूपी एटीएसनेही केली होती, ज्यात त्यांना काहीही आढळलं नव्हतं. या प्रकरणात आता नोएडा पोलिसांनीही सांगितलं आहे की, सीमाबाबत त्यांच्याकडे कोणताही आदेश आलेला नाही. हे प्रकरण कोर्टात आहे. जो आदेश येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.
वाचा: भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांकडे विनंती
22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवला होता, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत सार्क व्हिसा सवलत धोरणांतर्गत त्यांच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा बंद केल्या. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. याच दरम्यान सीमा हैदरबाबतही लोकांचं लक्ष तिच्यावर आहे. दरम्यान, सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती करत सांगितलं की, ती आता भारताची सून आहे. तिला येथेच राहण्याची परवानगी द्यावी.
सीमा बेकायदेशीरपणे भारतात आली होती
पाकिस्तानची रहिवासी असलेल्या सीमा हैदरने यूपीच्या नोएडा येथील रहिवासी सचिन मीणा यांच्याशी लग्न केलं आहे. दोघांची ओळख पबजी गेम खेळताना झाली होती. सीमा विवाहित आहे आणि तिला चार मुलं आहेत. ती आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानातून नेपाळला पोहोचली आणि तिथून बेकायदेशीरपणे मे 2023 मध्ये भारतात प्रवेश केला. ती आपल्या चारही मुलांना घेऊन आली होती. येथे येऊन तिने सचिनशी हिंदू रीति-रिवाजांनुसार लग्न केलं. नुकतंच त्यांना एक मूलही झालं आहे.