
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धार्मिक राजकारणारवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 22 जानेवारीचा पाया 1949मध्ये रचला गेला होता. तेव्हा जीबी पंत यांनी मंदिरात मूर्त्या ठेवण्याची परवानगी दिली होती. 22 जानेवारी रोजीचा पाया तर 6 डिसेंबरमध्ये रचला. 6 डिसेंबर झाला नसता तर 22 जानेवारी उजाडला असता?, असं सांगतानाच मी नथुराम गोडसेच्या विरोधात आहे. पण म्हणून बाबरी मशीद जिंदाबाद बोलणं चुकीचं आहे, असं नाही, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे सत्ता संमेलनाचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये असदुद्दीन ओवैसी बोलत होते. आस्थेच्या ग्राऊंडवर निर्णय घेत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. आज तीच मोठी समस्या झाली आहे. आणि उद्याही ही समस्या कायम राहील. आस्थाचा फॅक्टर मानला गेला तर साक्ष्य काय असेल? जर कोर्ट आस्थेवरून निर्णय द्यायला लागलं तर माझ्या आस्थेपेक्षा तुमची आस्था मोठी कशी होईल? राम मंदिराच्या निर्णयानंतर आणखी काही मुद्दे उचलले जातील अशी मला भीती होती. आज तेच घडताना दिसत आहे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
मी नथुरामाच्या विरोधात आहे. पण बाबरी मशीद जिंदाबाद बोलणं चुकीचं नाही. बाबरी तोडून मंदिर बनवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही. मंदिर तोडून मशीद बनवली असं भाजप नेहमी म्हणायची. सर्वोच्च न्यायालयाने भाजपचा हा दावा फेटाळून लावला आहे. भाजपला राम मंदिराची आठवण कधी आली? हे तुम्ही सांगू शकता का? त्यांनी पालनपूरचा रिसॉल्युशन 1989मध्ये मंजूर केला. त्या आधी तर तो मंजूर झाला नव्हता. पालनपूरच्या नंतरच मंदिर तोडून मशीद बनवल्या गेल्याचं म्हटलं जाऊ लागलं. राम मंदिरासाठी 1880पासून कायदेशीर लढाई सुरू आहे. मशिदीसमोर एक चबुतरा होता. तेव्हा कधीच मशिदीवरून वाद नव्हता. त्या ठिकाणी मशीद मंदिर बनवलं गेलं. राम मंदिराच्या निर्णयावर अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत, असं सांगतानाच बाबरी विद्ध्वंस करणाऱ्या एकाही आरोपीला आतापर्यंत शिक्षा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही शेतकरी आंदोलनाच्या सोबत आहोत. शेतकरी आंदोलन एक अराजकीय आंदोलन आहे. आमचं आंदोलन अराजकीय असल्याचं शेतकऱ्यांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांना समर्थन दिलं आहे. पण तिथे जाऊन आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.