ध्रुव राठी वादाच्या भोवऱ्यात, ‘त्या’ व्हिडीओवरील गंभीर आक्षेपानंतर घेतला मोठा निर्णय!
ध्रुव राठीच्या एका व्हिडीओमुळे चांगलाच वाद झाला आहे. या वादानंतर त्याने हा व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकलाय.

Dhruv Rathee : भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ध्रुव राठीच्या प्रत्येक व्हिडीओची संपूर्ण देशात चर्चा असते. यावेळी मात्र त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर आक्षेप घेतला जात आहे. विशेष म्हणजे व्हिडीओवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर ध्रुव राठीने हा व्हिडीओ प्रायव्हेट केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
ध्रुव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ‘द राईज ऑफ शिख’ या नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत काही ग्राफिक्स तसेच एआयचा वापर करण्यात आला होता. याच व्हिडीओतील एका क्लिपवर आक्षेप घेण्यात आला होता. ध्रुव राठीवर कारवाई करावी, अशी मागणी पंजाब तसेच इतर प्रांतातून होत होती. व्हिडीओला विरोध झाल्यानंतर ध्रुव राठीने तो व्हिडीओ हटवला आहे.
व्हिडीओत नेमकं काय होतं?
ध्रुव राठीने अपलोड केलेला हा व्हिडीओ एकूण 24 मिनिटे आणि 37 सेकंदांचा होता. या व्हिडीओत शीख धर्माबाबत सांगण्यात आलं होतं. या धर्माचा इतिहास, शीख धर्मगुरू यावरही माहिती देण्यात आली होती. मात्र शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) या व्हिडीओवर गंभीर स्वरुपाचे आक्षेप घेतले होते. रविवारी रात्री हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.
ग्रेवाल यांनी काय आरोप केला होता?
या आक्षेपांनंतर ध्रुव राठीने हा व्हिडीओ यूट्यूबवरून हटवला आहे. SGPC चे सरचिटणीस गुरुचरणसिंग ग्रेवाल यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. शीख धर्मियांना तसेच इतरांना शिखांचा इतिहास समजून घेण्यासाठी ध्रुव राठीच्या अॅनिमेटेड व्हिडीओंची गरज नाही. ध्रुव राठी याने काही ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली आहे, असा दावा ग्रेवाल यांनी केला होता.
ध्रुव राठीने स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, व्हिडीओवर वाद झाल्यानंतर खुद्द ध्रुव राठी यानेही त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबाबत मी आभारी आहे. अनेकांनी या व्हिडीओची प्रशंसा केली. तसेच हा व्हिडीओ चॅनेलवर ठेवावा असे आवाहन केले. मात्र मी त्या व्हिडीओला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडीओतील काही अॅनिमेटेड दृश्य शीख गुरूंच्या तसेच शिखांच्या धार्मिक भावनेविरोधात असल्याचे अनेकांचे मत आहे. हे प्रकरण धार्मिक तसेच राजकीय वादाचे कारण होऊ नये अशी माझी भूमिका आहे. भारातील हिरोंची कथा सांगणे हाच या व्हिडीओमागाचा उद्देश होता, असे ध्रुव राठीने स्पष्ट केले आहे.