BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

मानवी स्वभाव नकारात्मकतेकडे झुकण्याचा आहे. वाईट गोष्टी आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहतात. पटकन लक्ष वेधून घेतात.

BLOG: तथ्यप्रियता - भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 10:28 PM

आत्ताच नवीन वर्षाच्या सुरवातीला मागच्या वर्षीचा आढावा घ्यायचं ठरवलं. चांगल्या-वाईट गोष्टी आठवताना अपूर्ण राहिलेल्या कामांची यादी, अप्रिय घटना, दुःखद प्रसंग हे जितक्या चटकन लक्षात आले. त्या तुलनेत थोड्या चांगल्या गोष्टी आठवायला त्यापेक्षा खूपच जास्त डोकं वापरावं लागलं. थोडक्यात, मानवी स्वभाव नकारात्मकतेकडे झुकण्याचा आहे. वाईट गोष्टी आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहतात. पटकन लक्ष वेधून घेतात.

मागील वर्षी माझ्या जवळच्या एका नातलगाचा अचानक झालेला मृत्यू आठवून फार वाईट वाटलेलं. वय  जेमतेम 35 वर्षे. हसत-खेळत राहणारा हा माणूस एका लग्नात नाचताना वारला. अगदी अविश्वसनीय अशी घटना! एवढ्या कमी वयात वारला, म्हणून सगळेजण हळहळत होते. माझी आजी सारखं म्हणायची, “आजच्या काळात महागाई फार वाढलीय आणि मरण फार स्वस्त झालंय. आमच्या काळी असं नव्हतं. 2 रुपयांमध्ये सगळा बाजार होऊन पैसे शिल्लक राहायचे आणि माणसं/बायका खूप जगायचे.” ‘आमच्या काळी’ पासून सुरु होणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींबाबत तिच्याकडून ऐकलंय… जणू काही हे तिचं ब्रीदवाक्यच होतं!

बऱ्याचदा म्हातारी माणसं त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वेळी कसं सगळं चांगलं होतं आणि आता परिस्थिती कशी वाईट आहे, याची उदाहरणं देत असतात. मला मात्र कायम आश्चर्य वाटत राहतं; की यांची पिढी शिकू शकली नाही, त्या पुढची पिढी थोडं शिकली आणि  मग नातवंडं दुसऱ्या देशात जाऊन राहू लागली तरी खरंच त्यांचाच काळ चांगला होता का? कॉलरा, टायफॉईड अशा साध्या साथीच्या रोगांवर उपचार मिळत नव्हते आणि त्यामुळे गावच्या गावं नकाशातून गायब होत होती, तरी माणसं दीर्घायुषी होती? 

आपल्या मनांत एक मोठ्ठा गैरसमज घर करून बसलाय की “जग वरचेवर वाईटच होत चाललंय!” आपण हे इकडून तिकडून नेहमीच ऐकत असतो. मध्यंतरी 21 व्या शतकात जगबुडी होणार आहे यावर काही सिनेमे देखील येऊन गेले. पण याला पुरावा काय?  खरंच जगात सगळं वाईट घडत आहे का? बरोबर आहे की, दहशतवाद बळावलाय, कर्करोग आणि हृदयरोगाने मरण पावणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय, ध्रुवांवरचा बर्फ वितळत आहे आणि आपण जर कार्बन उत्सर्जन असंच चालू ठेवलं तर जगबुडी काही दूरची गोष्ट नाहीये. उर्जा स्त्रोतांचे संपत आलेले साठे आणि त्यावरील राजकारण भविष्यात सर्वांना अंधारात लोटणार आहे.

आर्थिक स्थैर्य, सौहार्दता आणि आपलं या ग्रहावरचं अस्तित्व टिकवायला आपल्याला आंतरराष्ट्रीय सहयोग हा एकमेव उपाय दिसतोय. मात्र त्यासाठी आजची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे! खूप लोकांना असं वाटतं की जगाचा अंत जवळ आलाय आणि याचा ते अप्रत्यक्ष ताण घेत असतात. 

पण याला पुरावा काय?

प्रा. हांस रोस्लिंग यांनी United Nations official website वरची माहिती त्यांच्या TED Talk मध्ये मांडली, त्याचा एक वेगळाच सकारात्मक परिणाम लोकांवर होताना त्यांना जाणवला. जो प्रगतीचा पुरावा आपण मागतो तो पुरावाच त्यांनी आपल्या पुढ्यात ठेवलाय असं वाटतं. संख्याशास्त्राचा उत्तम उपयोग प्रा. हांस यांना उमगला होता.

आपला एक समज आहे की गरीबी वाढतेय. जीवघेण्या रोगांचे बळी वाढताहेत. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालाय इत्यादी. UN website वरील माहिती पाहता असे लक्षात येईल की, वरचेवर गरीबी कमी होतेय. शिक्षणाचा दर्जा सुधारतोय. आरोग्य सुविधा सर्वांना पोचाव्यात असे प्रयत्न जगभर चालू आहेत. आपण आधी वाढती दरी (THE GAP INSTINCT) या ब्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे लेवल 1 वरचे लोक कायम तिथेच राहणार नाहीत, ते सतत वरच्या लेवलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि डेटाबेस ही असाच कल दाखवतोय.

म्हणजेच आजी जे म्हणायची, की आमच्या वेळी लोक अशी पटापट मरत नव्हती वगैरे त्यात तथ्य नाही असं जाणवतं. कारण जुन्या काळी लोक साध्या साध्या आजारांनी मरायची. कॉलरा, टी.बी., मलेरियाची साथ आली की गावांमध्ये होत्याचं नव्हतं व्हायचं. आज परिस्थिती खूप चांगली आहे. वैद्यकीय शास्त्राने असाधारण प्रगती केलीये. अपवादात्मक केसेस सोडल्या तर आज जगभरात सरासरी आयुर्मान किमान 70 वर्षे आहे. पूर्वी पुरामुळे, दुष्काळामुळे असंख्य लोकं मारली जायची, विस्थापित व्हायची. आज आपत्कालीन व्यवस्था कार्यरत असल्यामुळे ही संख्या शून्य नसली तरी खूप कमी झाली आहे. 

अपेक्षित जीवनमान 1925 ते 2015

गेल्या १०० वर्षांमध्ये महिलांची स्थिती तर खुपच बदलली आहे. उदाहरणार्थ इतिहासात अभावानेच आढळणारा महिलांचा मतदानाचा अधिकार आता जवळपास सर्व देशांनी मान्य केला आहे. कुठल्या देशाने तो किती साली मान्य केला ते खालील आकृतीमध्ये पाहता येईल.

1927 मध्ये कॅथ्रीन मायो या अमेरिकन विदुषींनी ‘मदर इंडिया’ हे पुस्तक (पुस्तक येथे वाचा) लिहिलं. यामध्ये सामान्य व्यक्ती, भारतीय स्त्रिया व अस्पृश्य यांच्या जीवनाचे वर्णन ऐकून जगभर खळबळ उडाली होती. हे पुस्तक व त्यातील मांडणी इतकी स्फोटक व मन हेलावून टाकणारी होती की लेखिका व पुस्तकाच्या प्रतिकृती भारतभर जाळण्यात आल्या. पुस्तकावर बंदी घालण्यात आली, तर दुसरीकडे हे पुस्तक मोफत वाटण्यात आले. पुस्तकाच्या विरोधात व समर्थनात कित्येक पुस्तके प्रकाशित झाली.

लेखिकेच्या उद्देश्यावर मुख्यत्वे टीका करण्यात आली, पण कॅथ्रीन मायोंनी त्या काळातील समाजाचे (खास करून भारतीय उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांचे) जे वर्णन केले आहे त्यातील तथ्य लक्षात घेतले तर आज भारतीय हिंदू संस्कृती व समाजामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे हे मान्य करावं लागेल.

अमेरिकेतील आफ्रो-अमेरिकन विद्यार्थ्यांना गोऱ्या मुलांच्या शाळेत सोबत शिकता येण्यास सुरवात 1950 च्या दशकात झाली. प्रचंड जनक्षोभाला न जुमानता डोरोथी काऊन्ट या 15 वर्षीय शाळकरी मुलीने गोऱ्यांच्या शाळेत प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी ती शाळेत जाताना लोकांनी तिला शिव्या दिल्या, तिच्यावर थुंकले, धमक्या दिल्या. (चार दिवसांमध्ये तिला शाळेतून प्रवेश काढून घ्यावा लागला होता. ती शाळेत जात असतानाचा ऐतिहासिक व्हिडीओ इथे पहा) या गोष्टीला 100 वर्षेही झाली नाहीत; परंतु आज जगभर स्त्रिया, निग्रो, दलित व अस्पृश्य यांच्यासाठी ज्ञानाची दारे खुली झाली आहेत.

तर मुख्य मुद्दा असा की, आपलं लक्ष वाईट गोष्टीवर चटकन जातं आणि चांगल्या गोष्टी लक्षात यायला मात्र वेळ लागतो. इथे मुख्यत्वे 3 गोष्टी घडतात:

भूतकाळातल्या गोष्टींना जाणीवपूर्वक विसरणे – आई-वडील, आजी-आजोबा जाणीवपूर्वक काही दु:खद, क्रूर व त्रासदायक गोष्टी पुढच्या पिढीपासून लपवतात. काही राजकीय शक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी खोटा इतिहास उभा करतात. आपण विश्वासू सूत्रांकडून (पुस्तके) इतिहास व सत्य समजून घेत नाही. आपण उथळ माहितीवर किंवा केवळ वैयक्तिक अनुभवांवर विसंबून राहतो इ. अशा गोष्टींमुळे आपल्याला आजच्या जगाची तुलना करताना योग्य संदर्भ राहत नाहीत.

प्रत्येक देशाला आणि तिथल्या नागरिकाला आपल्या देशाच्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असतो. ऐतिहासिक स्थळांना सरकारी निधी खर्चून जपलं जातं. अगदी सिनेमांमधून सुद्धा पुरातन काळातल्या भव्य-दिव्यतेची झलक दाखवायचा प्रयत्न केला जातो.आपले पूर्वज किर्तीमान होते, महान होते, शूर-वीर होते, दयाळू होते, दानशूर होते, विद्वान होते हे वाचताना, बोलताना किंवा पाहतांना आपला ऊर अभिमानाने भरून येत असतो. सगळं असं छान-छानच असेल? इतकं सगळं goody-goody असणं एकांगी नाही वाटत?

आपल्या प्रगतीचा आणि तंत्रज्ञानाचा जगभर टेंभा मिरवणारे जर्मनी हे राष्ट्र एका काळ्याकुट्ट अमानुष इतिहासासाठी जगभर ओळखले जाते. क्रौर्याची परिसीमा गाठत जर्मनीत ज्यू लोकांचा अमानुष छळ झाला. त्यांना जीवे मारण्यात आले याची साक्ष देणाऱ्या छळछावण्या आजही भयावह वाटतात आणि त्या मुद्दाम जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. कारण हे परत घडू नये यासाठी. तसेच, उद्याच्या पिढीला हे सांगूनही पटणार नाही की एका माणसाच्या प्रभावामुळे अशा घटना घडल्या आहेत.

पत्रकारांनी निवडक बातम्या आपल्यापर्यंत पोचवणे –  पूर आला, दुष्काळ पडला, भूकंप झाला या गोष्टी जितक्या सहजासहजी आपल्यापर्यंत पोहचतात त्याच्या अगदी उलट एखाद्या सकारात्मक बदलाबद्दल होते. लाखो लोकांना प्राथमिक आरोग्यसेवा पुरवून त्यांचा आरोग्यस्तर वाढवल्याची बातमी क्वचितच येते आणि आली तरी पहिल्या पानावर नसते. प्रेसला ‘अच्छे दिन’ आल्यामुळे आधीपेक्षाही इंटरनेटच्या युगात आपल्या कानांना आणि डोळ्यांना नकारात्मक गोष्टी सतत दिसत राहतात, ज्यामुळे आपण जगाबद्दल नकारात्मक मत करून बसतो.

आपण एक गोष्ट समजून घेऊ – आपल्यापर्यंत एखादी वाईट बातमी पोचायला वेळ लागत नाही पण चांगली बातमी मात्र काही सहजासहजी कानावर पडत नाही. बऱ्याच गोष्टी बदलायला खूप काळ जातो. छोट्या छोट्या स्तरांवर सुधारणा होत असतात. कासवगतीनेच पण मानवी प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला एखाद्या गुप्त चमत्कारासारख्या घडत असतात, पण फार क्वचित वेळा किंवा जवळजवळ शून्य वेळा आपण याची नोंद घेतो. समजा, तुमच्या परिसरात एखाद्या हॉस्पिटलची बिल्डिंग बांधली जातेय हे जोपर्यंत त्याच्या उद्घाटनाचा दिवस येत नाही, तोपर्यंत आपल्याला माहीतच नसते. म्हणजेच, “Good news is not a news!”

जोपर्यंत गोष्टी पूर्णपणे बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना चांगल्या न म्हणणे – म्हणजेच एखादी गोष्ट सुधारतेय पण पूर्ण सुधारणा झाल्याशिवाय तिला मान्यता न देणं. उदा. भारतात साक्षरतेचं प्रमाण वाढतेय पण जोपर्यंत ते 100% होत नाही, तोपर्यंत या प्रगतीला मान्य न करणे. SITUATION IS BAD, BUT IS GETTING BETTER. एकाच वेळी “BAD & BETTER” असू शकते हे मान्य केलं पाहिजे.

याचा अर्थ जगात सगळं आलबेल आहे, काहीच वाईट नाही असा आहे का? तर नाही. पण एकंदरीत, जगाबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन असेल तर तो आपण माहितीच्या आधारे तपासून पहायला हवा. बऱ्याच गोष्टींना अजूनही सुधारणेचा वाव आहे; पण फक्त त्याच गोष्टी पाहून जगभरची परिस्थिती अशीच असेल असा पूर्वग्रह देखील बाळगू नये. वास्तविक पाहता आजचे जग आधीपेक्षा खरंच खूप सुधारलेलं आहे.

We really have come a long way and yet miles to go!

(फॅॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित)

टीप : लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.