तर रायगडावर अस्थी ठेवण्याची प्रथा पडेल? नेमकं काय घडलं स्वराज्याच्या ऐतिहासिक किल्ल्यावर?

तर रायगडावर अस्थी ठेवण्याची प्रथा पडेल? नेमकं काय घडलं स्वराज्याच्या ऐतिहासिक किल्ल्यावर?
रायगडावर कुणी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केला? दोन संशयीतांमुळे वाद

लिखाणाचा वाद-प्रतिवाद यापुढेही सुरुच राहणार आहे. मात्र किल्ल्यांवर अस्थी नेण्याची जर प्रथा सुरु झाली, तर उद्या प्रत्येक जण किल्ल्यांवर येऊन अस्थी विसर्जन करु लागेल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 10, 2021 | 7:33 PM

बाबासाहेब पुरंदरेंना जाऊन 3 आठवडे झालेयत. मात्र आता त्यांच्या अस्थीवरुन नवा वाद रंगलाय. काही शिवप्रेमींच्या दाव्यानुसार बाबासाहेब पुरंदरेच्या अस्थी विसर्जनासाठी किल्ले रायगडावर आणल्या गेल्या. प्राथमिक माहितीनुसार पुण्यातून 2 मुलं रायगडावर पोहोचली. त्यांच्याकडे राखसदृश्य पावडर आणि काही पुस्तकं होती. रायगडावरच्या महाराजांच्या समाधीसमोर त्यांना त्या वस्तू ठेवायच्या होत्या. मात्र तेवढ्यात काही शिवप्रेमींनी त्यांना रोखलं आणि वादाला सुरुवात झाली. कथितपणे अस्थी विर्सजनासाठी आलेली दोन्ही मुलं आपल्याकडे अस्थी नसल्याचा दावा करतायत. तर दुसरीकडे त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी चंदन आणि अत्तरात भिजवून अस्थी आणल्याचा दावा केलाय.

वाद टोकोला पोहचल्यानंतर पोलीस गडावर दाखल झाले. दोन्ही मुलांकडची राखसदृश पावडर पोलिसांनी जप्त करुन दोघांनाही ताब्यात घेतलंय. आणि त्या पावडरमध्ये खरोखर अस्थी होत्या, की मग इतर अजून काही होतं, याच्या तपासासाठी ती पावडर केमिकल अॅनालिसीससाठी पाठवण्यात आलीय.

किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाचा वाद बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनापासून सुरु झाला होता. पुरंदरेंच्या निधनानंतर ११ किल्ल्यांवर पुरंदरेंच्या अस्थी विसर्जीत करण्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र तेव्हापासून संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनी त्याला विरोध केला होता.

काही जण पुरंदरेंच्या लिखाणाच्या बाजूनं असतील, तर काही जण लिखाणाच्या विरोधात. लिखाणाचा वाद-प्रतिवाद यापुढेही सुरुच राहणार आहे. मात्र किल्ल्यांवर अस्थी नेण्याची जर प्रथा सुरु झाली, तर उद्या प्रत्येक जण किल्ल्यांवर येऊन अस्थी विसर्जन करु लागेल.

पुरंदरे असतानाही वाद होते. आणि आता पुरंदरेंच्या निधनानंतरही वाद रंगतोय. पुरंदरे हयात असताना एक गट बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या कामाचं कौतुक करणारा होता. तर दुसरा गट पुरंदरेंच्या लिखाणावर कायम आक्षेप घेत आला. सामाजिक संघटना यावरुन कायम आमने-सामने येत आल्या आहेत. मात्र इतर पक्षांची भूमिका पुरंदरेंवरच्या आक्षेपावरुन कधी आक्रमक तर कधी मवाळ राहिलीय. फक्त मनसेनं जाहीरपणे पुरंदरेंच्या समर्थनात अनेकदा भूमिका घेतलीय.

तूर्तास या वादावर काही शिवप्रेमी संघटना अस्थी पुरंदरेंच्या होत्या म्हणून नव्हे, तर किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाची परंपरा सुरु होऊ नये, म्हणून विरोध करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे खरोखर त्या राखसदृशय् पदार्थात काय होतं, हे आता तपासाअंती कळणार आहे.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें