चंद्रकांत पाटलांना बदलण्याची चर्चा का होतेय?; खरंच बदललं जाणार का?

| Updated on: Aug 08, 2021 | 3:43 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे इतरही महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची चर्चा आहे. (chandrakant patil)

चंद्रकांत पाटलांना बदलण्याची चर्चा का होतेय?; खरंच बदललं जाणार का?
chandrakant patil
Follow us on

नवी दिल्ली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे इतरही महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची चर्चा आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष आणण्याची चर्चाही जोर धरत आहे. पाटील यांना खरोखरच बदललं जाणार आहे का? पाटील यांना बदलण्यात येणार असल्याची अचानक चर्चा का सुरू झालीय? या सर्व प्रश्नांचा घेतलेला वेध. (why bjp wants to change maharashtra president?, read story)

पाटील काय म्हणाले?

भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मग नवा अध्यक्ष कोण होणार?

चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचं भाजपमध्ये घटत आहे. केंद्रात भाजपने अधिकाधिक ओबीसी नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत. राज्यातही ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. त्यामुळे भाजप नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी प्रदेशाध्यक्ष होईल

चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी नवा प्रदेशाध्यक्ष आणण्यामागे भाजपची राजकीय खेळी असावी असं वाटतं. काँगेसने नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर आणि नागपूरमध्ये गेल्या 55 वर्षात जी जागा हरली नाही. त्या जागेवर भाजपचा पराभव झाला. कारण ओबीसींचा राजकीय विचारधारेचा उदय झाला आहे. राजकीय अस्मिता जागृत झाली आहे. ओबीसी जनगणनेवरून ओबीसी समाज भाजपविरोधात आक्रमक झाला आहे. त्यामुळे भाजप बहुधा ओबीसी व्यक्तिला प्रदेशाध्यक्ष करतील, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते ब्राह्मण आहेत. प्रदेशाध्यक्ष मराठा आहे. यात ओबीसी कुठेच दिसत नाही. भाजपच्या चुकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण गेलं. कारण केंद्र सरकारने ओबीसींची आकडेवारी दिली नाही. हा सुद्धा एक मुद्दा आहे. आतापर्यंत ओबीसीमुळेच भाजपला मोठं यश मिळालं. पण पदं देताना त्या प्रमाणात दिले गेले नाही. ही तक्रार केली जात आहे. त्यामुळे ओबीसी प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

पंकजा मुंडे, बावनकुळेंची शक्यता कमी

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत पंकजा मुंडे कुठेच नसतील. होणारा अध्यक्ष फडणवीसांच्या विश्वासातील किंवा ते सांगतील तसंच वागणारा असेल. त्यामुळे पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष होण्याची शक्यता कमी वाटते. चंद्रकांतदादांना सध्या तरी कोणता रोल नसेल. कदाचित त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत एखादं पद देवून त्यांची बोळवण केली जाईल. सध्या तरी त्यांची उपयुक्तता राहिली नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांची उपयुक्तता राहिली नाही. मराठा चेहरा म्हणून त्यांना पुढे आणण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण ते मराठा फेस बनू शकले नाही. कोल्हापुरातील त्यांची कामगिरीही समाधानकारक राहिली नाही, असं चुंचुवार यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे नुकसान करू शकणार नाही

पंकजा मुंडेंची फार राजकीय ताकद नाही. त्या ज्या समाजाचं नेतृत्व करतात. तो समाज विविध नेत्यांमध्ये विभागला आहे. एकीकडे धनंजय मुंडे आहे. दुसरीकडे पंकजा यांना काऊंटर करण्यासाठी भागवत कराड यांच्या रुपाने नवं नेतृत्व भाजपने निर्माण केलं आहे. पंकजा यांना अध्यक्ष करणं म्हणजे आयतं कोलित देण्यासारखं होईल. त्या कधीही पक्षाला अडचणीत आणू शकतील याची पक्षालाही कल्पना आहे. पंकजा यांनी कितीही असंतोष दाखवला तरी त्या बीड जिल्ह्याच्याबाहेर काही नुकसान करू शकणार नाही. जे नुकसान व्हायचं ते आधीच त्यांच्या पराभवाने झालं आहे. त्या फक्त थयथयाट करू शकतात. त्यांची काही राजकीय ताकद नाही हे भाजपला पुरेपूर माहीत आहे. त्यामुळेच कराड यांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने पुढे आणलं आहे, असंही चुंचुवार यांनी सांगितलं.

कुटेंकडे प्रदेशाध्यपद जाऊ शकतं

राजकीय पत्रकार आणि विश्लेषक विवेक भावसार यांनीही याबाबत त्यांची निरीक्षणे नोंदवली. येत्या काही दिवसात भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमित शहांबरोबर भाजप नेत्यांची चर्चा सुरू आहे. संजय कुंटे या तरुण आणि ओबीसी नेत्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची शक्यता आहे. सध्या देशभर ओबीसी हे एकच कार्ड सुरू आहे. त्यामुळे कुंटे यांच्या रुपाने ओबीसींना प्रमोट करून व्होट बँक खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपचं लक्ष्य 2024 हे लक्ष्य आहे. त्यामुळे 250 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या असेल तर जो सर्वात मोठा वर्ग आहे. त्याला आकर्षित करणं हा एक भाग आहे. संजय कुटे तरुण आहेत. आक्रमक आहेत. दुसरं म्हणजे ते विदर्भातील आहेत. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं, असं राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.

सत्ता बदलाची अजूनही आशा

या आधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव चर्चेत होतं. त्यांचं नाव बाद झालं. कारण मुंबई पालिका निवडणुकीच्या आसपास राज्यात सत्तांतर होईल असं अजूनही भाजपला वाटतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखे अनुभवी नेते मंत्रिमंडळात हवे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाणार नाही, असं सांगतानाच चंद्रकांतदादांना मराठा-जैन असं म्हणून आणलं. पण ते मराठ्यांचा फेस बनू शकले नाही. त्यांच्याकडे आक्रमकपणाही नाही. त्यामुळे पक्षात शिथिलता आली आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याशिवाय भाजपकडे पर्याय राहिला नसावा, असंही भावसार म्हणाले. (why bjp wants to change maharashtra president?, read story)

 

संबंधित बातम्या:

ओबीसींना आरक्षण द्या, भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; मंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत; चंद्रकांत पाटील म्हणाले…

‘मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस’, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा घणाघात

(why bjp wants to change maharashtra president?, read story)