
आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा 'कौन बनेगा करोडपती' हा शो नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 11 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती'चा 17 वा सिझन सुरू होत आहे. या शोचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

यंदाही बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. या शोचा तिसरा सिझन सोडला तर बाकी सर्व सिझनचं सूत्रसंचालन त्यांनीच केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींनी या सिझनसाठी सर्वांत तगडं मानधन घेतल्याचं कळतंय.

अमिताभ बच्चन यांनी 'केबीसी 17'च्या प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटी रुपये फी घेतल्याचं कळतंय. हा शो आठवड्यातील पाच दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने, दर आठवड्याला ते 25 कोटी रुपये कमावणार आहेत. या हिशोबाने ते भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत महागडे सूत्रसंचालक ठरले आहेत.

याबाबतीत त्यांनी अभिनेता सलमान खानलाही मागे टाकलं आहे. सलमानला 'बिग बॉस ओटीटी 2'च्या 'वीकेंड का वार' एपिसोडसाठी 12 कोटी रुपये मिळायचे. तो आठवड्याला फक्तच दोन एपिसोड्स करत असल्याने, त्याची कमाई 24 कोटी रुपये इतकी होती.

सोनी टीव्हीने 4 एप्रिल रोजी एका प्रोमो व्हिडीओच्या माध्यमातून 'कौन बनेगा करोडपती 17'ची घोषणा केली. 'KBC 17'साठी नोंदणी सुरू झाली असून स्पर्धक सोनी लिव अॅप, एसएमएस किंवा IVR कॉलद्वारे नोंदणी करू शकतात, अशी माहिती त्यातून देण्यात आली.