
फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता अनुराग कश्यपने हा सिनेमा त्याला फारसा आवडला नसल्याचे सांगितले आहे. नेमकं तो काय म्हणाला जाणून घ्या...

अनुराग कश्यपने नुकताच लल्लंटॉपशी संवाद साधला. दरम्यान, त्याने चित्रपसृष्टीसंबंधीत अनेक विषयांवर त्याचे मत मांडले. पण त्याने छावा विषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मुलाखतीमध्ये "छावा' पेक्षा मला तो चित्रपट हॉलिवूडच्या 'द पॅशन ऑफ द प्रिस्ट'सारखा वाटला. मला तो आवडला नाही...", असे अनुराग कश्यप म्हणाला.

अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, "मला असे वाटले की, एखाद्याला यातना देऊन जे काही घडत होते, ते मला नाही आवडत, मी बघू शकलो नाही. मी एकतर आता हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे. 'चमकीला', 'धडक 2', 'लापता लेडीज' काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत."

'छावा' सिनेमाविषयी पुढे अनुराग कश्यप म्हणाला की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवर छावा रिलीज झाल्यानंतर मी काही दृश्य पाहिली. ज्याची लोक चर्चा करत होते. विनीतसाठी मी ते पाहिले. विकी आणि विनीतचे जे शेवटचे दृश्य होते, ते मी पाहिले. मी याविषयी कोणतेही जजमेंट द्यायचे नाही, पण ती कहाणी सांगण्याची पद्धत मला नाही समजली, इतरांना कदाचित तेच आवडले असेल."