
तुम्ही अलिबागला अनेकदा फिरायला गेला असाल. वर्सोली, नागाव, अलिबागचा समुद्रकिनारा, अलिबागचा किल्ला ही ठिकाणं तुम्ही पाहिली असतील. मात्र अलिबागमध्येच असलेला कोर्लई नावाचा किल्ला फार कमी लोकांना माहीत असेल. या किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव वसलेलं असल्याने त्याच गावावरून गडाला कोर्लई किल्ला असं नाव पडलं असावं.

हा किल्ला पाहण्यासाठी कोर्लई गावातून जावं लागतं. किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. गावातील कोळीवाड्यातूनच किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला 23 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्ही ऑटो, कार किंवा दुचाकीने 45 ते 50 मिनिटांत पोहोचू शकता.

अलिबागच्या या कोर्लई गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत तुम्ही हा किल्ला चढू शकता. या किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग कोर्लई गावातून जातो आणि दुसरा दीपगृहावरून पायऱ्यांच्या मार्गाने जातो.

किल्ल्याच्या उत्तर टोकाला बुरुज आणि समुद्राकडे उघडणारं दार आहे. तर मुख्य द्वाराकडे जाताना ठिकठिकाणी तोफा आणि पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आढळतात. उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला हा किल्ला आहे.

या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहिर, मोडकळीस आलेला चर्च आणि तसंच एक मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्राला खेटून एक जुनं लाइटहाऊस (दीपगृह) आहे. हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीतांच्या ताब्यात होता.

या किल्ल्यावरून सागराचं विहंगम दृश्य पहायला मिळतं. पोर्तुगीज धाटणीचा हा किल्ला आपल्याला सहज त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पाडतो.

हा किल्ला जितका इतिहासाने समृद्ध आहे. तितकंच कोर्लई गावदेखील परंपरेनं समृद्ध आहे. पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांचा संगम इथे दिसतो.