
निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात यंदा उन्हाळ्यातही गर्दी पाहायला मिळत आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे भंडारदरा धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे अंब्रेला फॉल पुन्हा एकदा धो-धो कोसळत आहे.

भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने प्रसिद्ध अंब्रेला धबधबा प्रवाहित झाला आहे.

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असताना अंब्रेला फॉलमधून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना मोठा आनंद देत आहे.

या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक भर उन्हाळ्यातही भंडारदऱ्याकडे मोठ्या संख्येने येत आहेत.

राज्याच्या विविध भागातून कुटुंबियांसोबत आलेले पर्यटक अंब्रेला फॉलच्या नयनरम्य दृश्याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

एरव्ही थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा यावर्षी उन्हाळ्यात अंब्रेला फॉल सुरू झाल्यामुळे पर्यटकांनी गजबजले आहे.

अनेक पर्यटक येथे उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. पुढील आठ ते दहा दिवस पर्यटकांना अंब्रेला फॉलच्या या विलोभनीय दृश्याचा आनंद घेता येणार आहे.