
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी फक्त १० दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या हाय अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका धाडसी कारवाई केली आहे.

मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी ड्युटी फ्री स्कॉच मद्य तयार करणारा मोठा कारखाना उघडकीस आणला आहे. घाटकोपर आणि देवनार परिसरात कारखान्यात छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, नामांकित स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, बनावट स्टिकर्स, रिकाम्या बाटल्या आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरली जाणारी हिटगन जप्त करण्यात आले.

हा सर्व मुद्देमाल एकूण ९,१२,८६५ रुपये किंमतीचा आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई उपनगर-२ च्या पथकाला एका तरुण दुचाकीवरून विविध ब्रँडच्या बनावट ड्युटी फ्री स्कॉच बाटल्यांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घाटकोपर परिसरात सापळा रचत त्याला ताब्यात घेतले होते.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर देवनार कॉलनी परिसरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध नामांकित स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, स्टिकर्स, रिकाम्या बाटल्या आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरली जाणारी हिटगन असे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी गणेश पराग चौहान आणि संजय शांती वाघेला या दोन आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या एकूण ९.१२ लाख रुपयांच्या मुद्देमालामध्ये मद्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

त्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट मद्याची खरेदी करू नका, असे आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी नागरिकांना केले आहे.तसेच बनावट मद्य निर्मिती किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.