
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. स्माईल आणि दमदार भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

अशातच 31 जानेवारी रोजी प्रीती झिंटा आपला 51वा वाढदिवस साजरा करत असून, देश-विदेशातील तिचे असंख्य चाहते सोशल मीडियावर तिला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

प्रीती झिंटाच्या आयुष्यातील एक अतिशय विशेष आणि प्रेरणादायी बाब म्हणजे ती 36 मुलांची आई आहे.

यामधील 34 मुली तिने लग्नापूर्वी दत्तक घेतली आहेत. तिने या अनाथ मुलींना दत्तक घेत त्यांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

त्या वेळी प्रीती झिंटाने सांगितले होते की, या मुलींच्या शिक्षणापासून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यापर्यंत सर्व जबाबदारी ती स्वतः पार पाडेल. इतकेच नाही तर त्या मुलींना भेटण्यासाठी ती वेळोवेळी ऋषिकेश येथे येणार असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.

साल 2016 मध्ये प्रीती झिंटाने परदेशी व्यावसायिक जीन गुडइनफ यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 2021 मध्ये हे दाम्पत्य सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालक बनले. अशा प्रकारे प्रीती झिंटाच्या कुटुंबात एकूण 36 मुलांचा समावेश झाला.

लग्नानंतर प्रीती झिंटा आपल्या पती आणि दोन्ही मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. मात्र, ती आजही भारताशी घट्ट जोडलेली आहे. विशेष कार्यक्रम, सण-उत्सव किंवा आयपीएलच्या काळात ती आवर्जून भारतात येते.