Budget 2024: बजेटमध्ये रेल्वेसाठी काय मिळेल? वंदे भारत, सुरक्षा उपायांवर असेल भर
पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि सुरक्षा उपाय वाढवण्यासाठी अधिक पैसा मिळण्याची अपेक्षा आहे. यंदा 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट अर्थात पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अल्पावधीसाठी सादर होणारं केवळ लेखानुदान असेल.

बजेटमध्ये रेल्वेसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा
Image Credit source: Instagram
- देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या अनेक बदलांच्या टप्प्यातून जात असलेल्या भारतीय रेल्वेला या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. वंदे भारत आणि अमृत भारताशी संबंधित अर्थमंत्री रेल्वेसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये भारतीय रेल्वेसाठी पुरेशा भांडवलाची व्यवस्था केली जाऊ शकते.
- अर्थतज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 3 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली जाऊ शकते. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी अधिक असेल. निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी रेल्वेला 2.40 लाख कोटी रुपये दिले होते. 2013-14 च्या तुलनेत ही रक्कम जवळपास 9 पटीने अधिक होती.
- रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. वाढलेलं बजेट हे वेगवान गाड्या, रेल्वे स्थानकांची सुधारणा, सुरक्षा उपाय वाढवणं आणि मालवाहतुकीसाठी कॉरिडॉर तयार करणं यांसाठी वापरलं जाईल. पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपायांसाठी बजेटमध्ये सर्वाधिक पैसे दिले जाऊ शकतात.
- भारतीय रेल्वे यावर्षी सुमारे 400 वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा विचार करतेय. सध्या अशा 41 गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या गाड्यांचा वेग ताशी 130 किमी करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी रेल्वे ट्रॅकसह इतर सुरक्षेच्या उपायांमध्ये बदल करावे लागणार आहेत.
- गेल्या वर्षी देशभरात अनेक रेल्वे अपघातही झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा बजेट जवळपास दुप्पट होऊ शकतो. याशिवाय अमृत भारत स्टेशन योजनेसाठी अधिक रक्कम दिली जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत 1275 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे.





