
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. तर व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. या सिनेमाचं वरिष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कौतुक केलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी मराठी सिनेमे हिंदी भाषेत डब करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. सगळे दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब होत असतात. ते तुम्ही पाहता की नाही. मग मराठी सिनेमे का डब होत नाही? सगळेच नाही पण काही अतिशय टुकार दाक्षिणात्या सिनेमे हिंदीमध्ये डब केले जातात. मग प्रश्न पडतो की हे सिनेमे कसे काय चालले आणि हे सिनेमे का पाहावेत? असे टुकार सिनेमे देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात. मराठीमध्ये इतकं सकस सगळं निर्माण होतं. ते का डब केलं जात नाही?, असं नाना पाटेकर म्हणाले.

आता परवा एक 'फुलवंती' हा सिनेमा आला. तो सिनेमा पाहताना मला तो इतका छान आणि गोड वाटत होता. आमच्या रविंद्र महाजनींचा मुलगा गश्मीरने आणि प्राजक्ताने काय काम केलंय... व्हिज्युअली काय गोड दिसत होतं. अतिशय छान आणि श्रीमंत वाटावं अशी ही कलाकृती... मग का नाही हिंदीत डब केली जात?, असं म्हणत नाना पाटेकर यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

काकस्पर्श सारखा सिनेमा का नाही डब केला जात? काकस्पर्श हा काय सिनेमा आहे, सचिन खेडेकर आणि इतर मंडळींनी काय काम केलं आहे. आपल्याकडे एक एक नटमंडळी काय काम करत असतात, असं नाना पाटकर म्हणाले.

तुमच्याकडे फार छान आणि सकस आहे. जे हिंदीत डब केलं जात. जर हिंदीत डब झालं तर त्याला पाहणारा प्रेक्षक वर्ग वाढतो. आता सिनेमा करत असताना केवळ मराठी पुरतं मर्यादित न राहता सर्वस्पर्शी असलं की मग ते सोपं जाईल. मराठी सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं.