
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते रमेश देव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सिनेमा, अभिनय या कलाक्षेत्राला वाहून दिलं होतं. त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलांनीही आपला विशेष ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. वडिलांप्रमाणेत अजिंक्य देव अभिनय क्षेत्रात आहे. तर अभिनय देवही चित्रपटसृष्टीतच काम करत आहेत.

रमेश देव यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारे नुकसान चित्रपट सृष्टीचे झाले आहे. देव यांनी सुरूवातीपासून आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. 30 जानेवारील 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वढवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे.

देव यांनी 190च्या वर मराठी सिनेमांत अभिनय केला आहे, तर 285पेक्षा जास्त हिंदी सिनेमात भूमिका केल्या आहेत. अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील मालिकासांठी दिग्दर्शनह केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंही रमेश देव यांचा सन्मान करण्यात आला आहे. (फोटो सौज्यन्य-ट्विटर)