
पती-पत्नी हे एक विश्वासाचं नातं असतं. या नात्यात कधी सुख तर कधी दुख येत असतं. वादावादी होत असतात. पण नंतर सर्व काही अलबेलही होत असतं. पण अशावेळी पत्नीशी संबंधित कोणत्याही गोष्टी कुणालाही शेअर करू नका. नाही तर आयुष्य नर्क बनेल.

बायकोची कमजोरी अथवा दोष : बायकोची कमजोरी किंवा दोष कुणालाही सांगू नका. चाणक्याच्या मते पत्नीची कमजोरी किंवा दोष इतरांना सांगणं म्हणजे आत्मघात ठरू शकतो. त्यामुळे त्याचा दुसरा व्यक्ती गैरफायदा उचलू शकतो.

दोघांचे वाद : नात्यात छोटे छोटे वाद होतात. पण हे वाद घराच्या चार भिंतीतच राहिले पाहिजे. चाणक्याच्या मते, घरातील वाद दुसऱ्यांना सांगितल्याने तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. किंवा संबंधित लोक तुमच्या नात्यात विष कालवू शकतात.

पत्नीचे आजार किंवा व्यक्तिगत समस्या : बायकोची शारीरिक किंवा मानसिक समस्या कुणालाही सांगू नका. मित्र किंवा तोंडओळखीच्या लोकांना या गोष्टी सांगितल्यास ते त्याचा गैरफायदा उचलू शकतात. घरातील गोष्ट बाहेर सांगणं शहाणपणा नसून मूर्खपणा आहे, असं चाणक्य म्हणतात.

दाम्पत्य जीवनातील आतल्या गोष्टी : नवरा बायकोच्या आतील गोष्ट कुणालाही सांगू नका. कारण ती तुमची खासगी गोष्ट असते, तिसऱ्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, असं चाणक्य म्हणतात.

बायकोच्या निर्णयाची खिल्ली : एखाद्या गोष्टीत बायकोचा निर्णय चुकीचा निघाला म्हणून त्याची मित्रांसमोर खिल्ली उडवू नका. तिचा अपमान होईल असं बोलू नका. त्यामुळे पत्नीचा आत्मविश्वास आणि दोघांचं नातं तुटू शकतं. आयुष्यात कुणाचाही निर्णय चुकू शकतो. त्यामुळे त्याची खिल्ली उडवणं बरं नाही, असं चाणक्य म्हणतात.