
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले.

यानंतर शिंदेंनी खबरदारी म्हणून सर्व नगरसेवकांना वांद्र्यातील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्कामी ठेवलं होतं.

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अशा प्रकारे पंचतारांकित हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले? यावरून आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्यातच आता या पंचतारांकित वास्तव्यासाठी एकूण खर्च किती झाला, हा सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांच्या मुक्कामासाठी हॉटेलमध्ये तब्बल ३५ खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.

नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची संख्या ७० च्या आसपास होती. हॉटेलच्या या रुमचे एका दिवसाचे भाडे साधारणपणे २८ हजार ते ३३ हजार रुपयांच्या दरम्यान होते.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांसह एकूण ७० जणांसाठी केवळ राहण्याचा खर्च अंदाजे ३६ लाख रुपयांच्या आसपास आहे. तसेच हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉलचे भाडे तासाला ५०,००० रुपये होत, जिथे नगरसेवकांच्या बैठका पार पडल्या.

सत्ताधारी पक्षाकडून या मुक्कामाचे समर्थन करण्यात आले आहे. नवीन नगरसेवकांना महापालिकेतील कामकाजाची पद्धत, निधीचे नियोजन आणि तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी हे सत्र आयोजित केले होते.

तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या महिनाभराच्या तणावानंतर नगरसेवकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळावी, तसेच विश्रांती घेता यावी, यासाठी हे बुकींग करण्यात आले होते.

तर दुसरीकडे, विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बहुमत असतानाही नगरसेवकांना अशा प्रकारे नजरकैदेत का ठेवावे लागते? जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे का? असे सवाल विरोधकांनी विचारले आहेत.

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्थापनेपूर्वी हॉटेल पॉलिटिक्स नवे नाही, मात्र निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि बहुमत असतानाही सत्ताधारी पक्षाने ही खबरदारी घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आज अखेर हे सर्व नगरसेवक आपापल्या घरी परतले आहेत.