
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे.

औरंगाबादमध्ये 'टीव्ही 9 मराठी'ने या शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हे विदारक चित्र डोळ्यात अश्रू उभे करणारे आहे.

कपाशी, सोयाबीन आणि मक्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे.

मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.

मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

याठिकाणी इतका पाऊस पडला आहे की शेतजमिनीला पाणथळ जागेचे स्वरुप आले आहे.

कपाशीचे पीक घ्यायला गेलो तर संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेतकऱ्याने केला.

पाण्यात भिजल्यामुळे कपाशीच्या पिकाची झालेली ही अवस्था.