
उन्हाळा असो किंवा हिवाळा अनेक लोकांच्या पायांना सतत घाम येण्याची समस्या असते. या घामामुळे पायांना दुर्गंध येते. तसेच जेव्हा आपण कोणाच्याही घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी शूज काढतो, तेव्हा त्या वासामुळे आपल्याला संकोच वाटू लागतो.

पायाला घाम येऊन वास येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत याला ब्रोमिडोसिस म्हणतात. पण घाबरण्याचे कारण नाही, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मीठ टाका. यानंतर १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. मीठ त्वचेतील ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे वास येण्यासाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत. हा प्रयोग आठवड्यातून किमान ३-४ वेळा करावा.

अॅपल साईडर व्हिनेगरमध्ये नैसर्गिक आम्ल असते जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. एक भाग व्हिनेगर आणि दोन भाग पाणी असे मिश्रण तयार करून त्यात २० मिनिटे पाय ठेवा. यामुळे पायांच्या त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो आणि दुर्गंधावर नियंत्रण येते.

ब्लॅक टी मध्ये टॅनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. हे ॲसिड पायांवरील घामाच्या ग्रंथींना आकुंचन पावायला मदत करते, ज्यामुळे घाम कमी येतो. दोन कप पाण्यात दोन चहाच्या पिशव्या १५ मिनिटे उकळा. त्यानंतर हे द्रावण टबमधील साध्या पाण्यात मिसळा आणि पाय २० मिनिटे बुडवून ठेवा.

बेकिंग सोडा बॅक्टेरिया मारण्यासाठी उत्तम आहे. कोमट पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस टाका. लिंबामुळे पायांना ताजेतवाने वाटते आणि बेकिंग सोडा दुर्गंध पूर्णपणे शोषून घेतो. तसेच शूज घालण्यापूर्वी पायांवर आणि शूजच्या आत थोडी पावडर टाकावी. हे अतिरिक्त घाम शोषून घेण्याचे काम करते.

केवळ उपाय करून चालणार नाही, तर स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी नेहमी १०० टक्के सुती मोजेच वापरा. नायलॉन किंवा सिंथेटिक मोजे घाम शोषत नाहीत, ज्यामुळे वास वाढतो. दररोज मोजे बदला.

एकाच प्रकारचे शूज सलग दोन दिवस घालू नका. शूजला हवा लागण्यासाठी किमान २४ तासांचा अवधी द्या. शक्य असल्यास शूज अधूनमधून धुवा किंवा उन्हात ठेवा. तसेच अंघोळ करताना पायांच्या बोटांच्या मधील जागा साबणाने व्यवस्थित स्वच्छ करा. अंघोळ झाल्यावर पाय पूर्णपणे कोरडे केल्याशिवाय मोजे किंवा शूज घालू नका.