
भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि अंगावर शहारे आणणारा पराक्रम आज अहिल्यानगरकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. अहमदनगरच्या के.के. रेंजमध्ये जवानांनी केलेल्या युद्धाच्या प्रात्याक्षिकांनी अवघा परिसर दणाणून गेला होता.

हेलिकॉप्टर, मिसाईल आणि रणगाड्यांच्या कडकडाटात भारतीय सैन्याने आपल्या अजोड शक्तीचे दर्शन घडवले. के.के. रेंजमध्ये पार पडलेला हा सराव म्हणजे निव्वळ सराव नसून, प्रत्यक्ष युद्धभूमीचे जिवंत स्वरूप होते.

दोन तास चाललेल्या या थरारात शत्रूवर कशा प्रकारे अचूक मारा केला जातो, याचे दर्शन घडवण्यात आले. तोफांच्या आवाजाने अख्खा परिसर दुमदुमून गेला होता.

आधुनिक रायफल्स, मिसाईल्स आणि आकाशात झेपावणारी हेलिकॉप्टर्स पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी भारतीय लष्कराचे शक्तिशाली रणगाडे हे सरावाचे मुख्य आकर्षण ठरले.

अर्जुन आणि भिष्मा (T-90) यांसारख्या आधुनिक रणगाड्यांनी शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. अजया (T-72) आणि T-55 रणगाड्यांनी धुराचे लोट सोडून मैदानात केलेल्या हालचालींनी सर्वांच्या उरात धडकी भरवली.

दिवसा आणि रात्री, अशा दोन्ही वेळेस शत्रू राष्ट्राच्या कशा चिंध्या उडवल्या जातात, याचे तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. धुराचा लोट पाठीमागे टाकत, वेगवान हालचाली करत रणगाड्यांनी आपले लक्ष्य उद्ध्वस्त केले.

तेव्हा उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली. शत्रू राष्ट्राच्या उरात धडकी भरवणारा हा सराव पाहून भारतीय लष्कराची सज्जता किती उच्च दर्जाची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

तंत्रज्ञान आणि शौर्याचा हा संगम पाहून प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे. "शत्रूने पाऊल उचलण्यापूर्वीच त्याचा खात्मा करण्याची ताकद आपल्या सैन्यात आहे," असा विश्वास या निमित्ताने निर्माण झाला आहे.