
कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग शो 'लाफ्टर शेफ'चा दुसरा सिझन चांगलाच चर्चेत राहिला. या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून तीन जोड्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. यामध्ये अंकिता - विकी, अली- रीम आणि एल्विश - करण यांचा समावेश होता.

यंदाच्या सिझनचं विजेतेपद अभिनेता करण कुंद्रा आणि इन्फ्लुएन्सर एल्विश यादवने पटकावलं आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर या दोघांनी आनंद व्यक्त केला. करण आणि एल्विशचा ट्रॉफीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"मी जेव्हा या शोमध्ये भाग घेतला होता, तेव्हा मला प्रेक्षकांकडून इतकं प्रेम मिळेल, याची कल्पनासुद्धा केली नव्हती. तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत", अशा शब्दांत एल्विशने आनंद व्यक्त केला.

कुकिंग आणि स्टाइलच्या जोरावर या दोघांनी ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. 27 जुलै रोजी हा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर पार पडला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या तिन्ही जोड्यांना शेवटचा पदार्थ बनवण्याची संधी दिली होती आणि त्याच्या जोरावर विजेती जोडी ठरवण्यात आली.

करण आणि एल्विशने विजेतेपद जिंकलं. तर अली गोणी आणि रीम शेख या जोडीला 'लाफ्टर शेफ्स 2'चे उपविजेते म्हणून घोषित करण्यात आलं. ग्रँड फिनालेमध्ये सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारुकी यांनीही हजेरी लावली होती.