
अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान आज (12 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांकडून सारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच साराची सावत्र आई आणि सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूरनेही खास पोस्ट लिहिली आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये साराचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती सैफसोबत पोझ देताना दिसून येत आहे. दोघांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला असून डोळ्यांना काळा गॉगल लावला आहे.

या फोटोवर करीनाने लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग सारा. खूप सारं प्रेम आणि भोपळ्याची भाजी तुझ्यासाठी पाठवत आहे.' यासोबतच करीनाने हृदयाचा आणि इंद्रधनुष्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

सारा ही करीनाची सावत्र मुलगी असली तरी या दोघींमध्ये खूप चांगलं नातं असल्याचं पहायला मिळतं. रक्षाबंधन, होळी, दिवाळी अशा विविध सण-उत्सवांना साजरं करण्यासाठी सारा अनेकदा करीनाच्या घरी येते. साराचा भाऊ इब्राहिमचंही करीनासोबत मैत्रीपूर्ण नातं आहे.

सैफ अली खानने 1991 मध्ये अमृता सिंहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये हे दोघं विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांची दोन मुलं आहेत. घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर सैफने करीना कपूरशी दुसरं लग्न केलं.