अवघ्या 10 दिवसांत शूट झाला 104 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर, हिरोला एका दिवसाचे 2 कोटी; ओटीटीवर धुमाकूळ
हा चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यनच्या ओटीटी कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कमी दिवसांत पूर्ण झालेलं शूटिंग, वेगळा विषय आणि 20 कोटींच्या मानधनाची चर्चा यामुळे हा चित्रपट विशेष लक्षात राहिला. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येतो.

अभिनेता कार्तिक आर्यनने दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीतील एका चित्रपटासाठी त्याने घेतलेल्या मानधनाची आजही चर्चा होते. विशेष म्हणजे, अवघ्या 10 दिवसांच्या शूटिंगसाठी कार्तिकला तब्बल 20 कोटी रुपये मिळाले होते. हा चित्रपट म्हणजे 'धमाका'. 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या थ्रिलर चित्रपटासाठी कार्तिकने घेतलेल्या फीबद्दल स्वतः खुलासा केला होता.
कार्तिक आर्यनने 2023 मध्ये पत्रकार रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याला चित्रपटांसाठी मिळणाऱ्या मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 'प्यार का पंचनामा' या पहिल्या चित्रपटासाठी कार्तिकला केवळ 1.25 लाख रुपये मिळाले होते. मात्र, काही वर्षांतच त्याच्या मानधनात मोठी वाढ झाली. 'धमाका' चित्रपटासाठी त्याला 20 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा होती.
यावर रजत शर्मा यांनी कार्तिकला थेट प्रश्न विचारला. त्यावेळी अभिनेत्याने ही रक्कम 10 दिवसांच्या शूटिंगसाठी असल्याचं सांगितलं. कोरोना महामारीच्या काळात हा चित्रपट शूट करण्यात आला होता. चित्रपटासाठी केवळ 10 दिवस काम केल्याचं आणि त्यासाठी मिळालेलं मानधन 20 कोटी रुपये असल्याचं कार्तिकने मान्य केलं. निर्मात्यांना आपल्या कामातून फायदा मिळवून देत असल्याने हे मानधन योग्य असल्याचंही त्याने मिश्किलपणे सांगितलं.
'धमाका' हा राम माधवानी दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिकने अर्जुन पाठक नावाच्या टीव्ही न्यूज अँकरची भूमिका साकारली आहे. एका दहशतवाद्याचा फोन त्याच्या रेडिओ कार्यक्रमावर येतो. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात मोठं संकट निर्माण होतं. या घटनेचं थेट प्रक्षेपण करण्याची संधी त्याला मिळते. मात्र, या संधीसोबतच त्याच्यासमोर नैतिकतेचा आणि माणुसकीचा प्रश्न उभा राहतो.
या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाष यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय विकास कुमार आणि विश्वजीत प्रधान हे कलाकारही चित्रपटात दिसतात. कार्तिकची रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांमधील प्रतिमा बाजूला ठेवून गंभीर आणि वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळाली.