
झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यातील कलाकार अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. यामध्ये अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत होती.

याच मालिकेत अभिनेता निखिल चव्हाणनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता निखिल चव्हाण आणि शिवानी बावकरची जोडी एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवानीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, 'आम्ही डिसेंबरची वाट पाहतोय.' निखिल आणि शिवानीच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करत डिसेंबरमध्ये नेमकं काय आहे, असा प्रश्न विचारला आहे. काहींनी तर या दोघांना शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली आहे. ऑनस्क्रीन भाऊ-बहीण साकारणारे निखिल आणि शिवानी यांच्यात नेमकं काय शिजतंय, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

शिवानी सध्या स्टार प्रवाहच्या 'साधी माणसं' या मालिकेत काम करतेय. 'लागीरं झालं जी' या मालिकेतून शिवानीला खूप लोकप्रियता मिळाली. यातील तिची 'शीतली'ची भूमिका आजही प्रसिद्ध आहे.