
दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. मुंबईतील लालबागचा राजाची मूर्ती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे गिरगाव चौपाटीला पोहोचते आणि त्यानंतर तिथे विसर्जन केलं जातं.

लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर लोटला आहे. 22 तासांनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

लालबागचा राजासाठी यंदा खास पद्धतीने तराफा बनवण्यात आला आहे. या तराफ्यावरून बाप्पाला समुद्रात नेण्यात आलं. आज (रविवार) सकाळी साडेसातच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.

लालबागचा राजाची आरती झाल्यानंतर मूर्तीला तराफ्यावर बसवून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेण्यात येईल. परंतु नव्याने बनवलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचण येत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतरही मूर्तीला तराफ्यावर चढवता येत नाहीये.

लालबागचा राजाच्या रथावर उद्योगपती अनंत अंबानीदेखील उपस्थित होते. मुंबईतील अनेक गणपतींचं विसर्जन अद्याप बाकी आहे. हा विसर्जन सोहळा संपण्यासाठी दुपारपर्यंतचा अवधी लागू शकतो.