
हिंदी सिनेसृष्टीला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ज्या काही अभिनेत्री आहेत, त्यामध्ये मधुबाला यांचे नाव अजरामर आहे. सौंदर्य, अभिनय आणि मोहक हास्य यांचा अद्भुत संगम असलेल्या मधुबालांनी हिंदी सिनेमाला सुवर्णकाळ बहाल केला.

मात्र पडद्यावर नेहमी हसत राहणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अपार एकाकीपणाशी झुंज देत होती. 1940 च्या दशकात मधुबालांनी ‘बसंत’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

1947 साली दिग्गज कलाकार राज कपूर यांच्यासोबत आलेल्या ‘नील कमल’ या चित्रपटाने मधुबालांचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत त्या त्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

पैसा, यश आणि प्रसिद्धी मिळूनही मधुबालांच्या आयुष्यात प्रेमाची कायमच कमतरता राहिली. पत्रकार आणि लेखक मोहन दीप यांनी लिहिलेल्या ‘द मिस्ट्री अँड मिस्टिक ऑफ मधुबाला’ या चरित्रात त्यांनी मधुबालांचे एकाकी आयुष्य उलगडून दाखवले आहे.

त्यांच्या मते, मधुबाला आयुष्यभर असुरक्षिततेने ग्रासलेल्या राहिल्या आणि ज्या-ज्या पुरुषांवर त्यांनी प्रेम केले, ते सर्व त्यांना गमवावे लागले. मधुबालांच्या आयुष्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात वेळा प्रेम आले. पण ते टिकले नाही.

प्रेमाच्या अपयशांमुळे थकलेल्या मधुबालांना आयुष्याच्या शेवटी स्थिर नात्याची गरज होती. ‘चलती का नाम गाड़ी’ दरम्यान त्यांची ओळख किशोर कुमार यांच्याशी झाली आणि 1960 साली त्यांनी लग्न केले.

लंडनमध्ये उपचारासाठी गेल्यावर मधुबालांच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना फक्त दोन वर्षांचे आयुष्य उरल्याचे सांगितले.

आजार समजल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना माहेरी सोडले कारण ते तिची काळजी घेऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र मधुबाला त्यांच्यासोबतच राहू इच्छित होत्या. किशोर कुमार दर दोन महिन्यांनी त्यांना भेटायला येत असत, सर्व वैद्यकीय खर्च त्यांनीच केला आणि आदराने वागले.