
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या अंतिम आणि चौथ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम करण्यात आले. नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसर्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा 82 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

यानंतर तिसर्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी या 23 किमीच्या टप्प्यातही वाहनांचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे नागपूरपासून थेट इगतपुरीपर्यंत प्रवास सुरु झाला.

यानंतर आता इगतपुरी ते आमणे हा शेवटचा 76 किमीचा टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले. या भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही. तर हा महाराष्ट्राच्या समृद्घीचा इकोनॉमिक कॉरिडोअर आहे, असे म्हटले.

महायुती सरकारसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही २०१४ नंतर सरकार आल्यावर जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले. यात २४ जिल्हे जोडले आहेत. जे एन पिटीदेखील सोबत जोडला आहे. लवकरच वाढवण बंदराशी हा महामार्ग जोडला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.