
महाराष्ट्रात सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसने उमेदवारांच्या अधिकृत यादी जाहीर करताना दिसत आहेत.

मात्र या सर्व चढाओढीत एका शब्दाची सर्वाधिक चर्चा होत आहे. तो म्हणजे एबी फॉर्म. सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने अनेक उमेदवारांना हे फॉर्म वाटले आहे. ज्यांना एबी फॉर्म मिळाले, त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

पण हा एबी फॉर्म नक्की असतो तरी काय? निवडणुकीच्या काळात त्याला इतकं महत्त्व का असते. तो मिळवण्यासाठी उमेदवार इतकी धडपड का करत असतात, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आज आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गणले जाण्यासाठी आणि त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी 'एबी फॉर्म' सादर करणे बंधनकारक असते. हे दोन वेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात.

ए (A) फॉर्म हा एक अधिकृत पत्राचा नमुना आहे. जो राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवतात. या फॉर्मद्वारे पक्ष हे कळवतो की संबंधित निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्याचा आणि बी फॉर्मवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नेमका कोणत्या पदाधिकाऱ्याला देण्यात आला आहे. थोडक्यात, हे एका प्रकारचे अधिकृत ऑथरायझेशन असते.

बी फॉर्ममध्ये प्रत्यक्ष उमेदवाराचे नाव, पत्ता आणि मतदारसंघाचा उल्लेख असतो. या फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी असते. यामध्ये दोन उमेदवारांची नावे असतात. यात प्रमुख उमेदवार असतो, ज्याला पक्षाने प्रथम पसंती दिली आहे.

त्यासोबतच बी फॉर्ममध्ये एका पर्यायी उमेदवाराचे नाव दिले असते. जर मुख्य उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव छाननीमध्ये बाद झाला. तर पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारी आपोआप या पर्यायी उमेदवाराला मिळते.

जर एखाद्या उमेदवाराने पक्षाच्या नावाने अर्ज भरला पण एबी फॉर्म दिला नाही, तर त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळत नाही. त्याला अपक्ष मानले जाते. उमेदवारी अर्जाच्या वेळी एबी फॉर्म नसेल, तर संबंधित उमेदवाराचा पक्षावरील दावा न्यायालयही मान्य करत नाही.

महापालिका असो वा विधानसभा 'एबी फॉर्म' मिळणे म्हणजे पक्षाने तुमच्यावर शिक्कामोर्तब करणे होय. यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये हा फॉर्म मिळवण्यासाठी मोठी चढाओढ असते.

जर ही निवडणूक राज्यसभा किंवा विधानपरिषदेची असेल, तर याच फॉर्म्सना 'एए' (AA) आणि 'बीबी' (BB) असे संबोधले जाते. सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आता सर्वांच्या नजरा कोणाला 'एबी फॉर्म' मिळतो आणि कोणाचे तिकीट कापले जाते, याकडे लागल्या आहेत. (सर्व फोटो - पीटीआय)