
आंबोलीत हवेत तरंगणारा बेडूक (Malabar Gliding Frog) आढळून आला आहे. एका फांदीवरून दुसर्या फांदीवरून उडी मारताना तो हवेत काही अंतर अक्षरशः तरंगत जातो.

तरंगण्यासाठी त्याच्या पायांची बोटे एकमेकांना त्वचेच्या पातळ पडद्याने जोडली जातात.

हवेत असताना शरीर एकदम सपाट आणि चपटे करून त्याचा उपयोग हवेवर असणारा पृष्ठभाग वाढविण्यासाठी करून हे बेडूक सहजगत्या एका झाडावरून दुसर्या झाडावर तरंगत जातात म्हणून या बेडकाला उडणारा बेडूक (Malabar Gliding Frog) म्हणून ओळखले जाते.

हा बेडूक महाराष्ट्रातील कोल्हापूर चांदोली व सिंधुदुर्गाच्या पश्चिमघाटील दोडामार्ग व आंबोली परीसरात आढळून येतो. इतर बेडकांप्रमाणेच हा वर्षातील साधारण आठ ते नऊ महीने निद्रावस्थेत असतो.

मान्सूनच्या आगमनानंतर जून महिन्याच्या पहिल्या पावसात हे बेडूक जागे होतात आणि त्याचे जीवनचक्र सुरू होते. या बेडकाचे दुर्मीळ जीवनचक्र आंबोलीत रात्रीच्यावेळी सहज पाहू शकता.

आंबोलीत आढळणाऱ्या या दुर्मीळ 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग'(उडणाऱ्या बेडकाच्या) जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी सध्या वन्यजीव अभ्यासक व पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.

वन्यजीव अभ्यासक व पर्यटकांसाठी मलबार ग्लायडिंग फ्रॉग' (उडणारा बेडकू) हा आंबोलीत आढळून आल्यामुळे पर्वणीच ठरत आहे.