
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मोठा दसरा मेळावा होत आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांनी हा दसरा मेळावा आयोजित केला होता.

सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. असे असले तरी हजारोंच्या संख्येने लोक जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला आले आहेत.

दरम्यान, या दसरा मेळाव्याच्या एक दिवस अगोदर जरांगे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जरांगे यांचा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मात्र तरीदेखील प्रकृती बरी नसतानाही जरांगे या मेळाव्याला आले आहेत. यावेळी त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली दिसली. तसेच त्यांचा चेहरा थकलेला होता. उठतानाही त्यांना त्रास होत आहे.

असे असूनही जरांगे दसरा मेळाव्यासाठी लोकांना संबोधित करण्यासाठी आले. त्यांनी खुर्चीवर बसूनच जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. या मेळाव्याला हजारो मराठा बांधव हजर झाले होते.