
सैराट या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकणाऱ्या रिंकू राजगुरुला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिला एका चित्रपटातून रातोरात स्टार बनवले. आता रिंकूचा आशा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका सध्या चर्चेत आहे. दरम्यान, रिंकूचा एक किस्सा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

रिंकू राजगुरुने नुकताच लगाव बत्ती या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एक किस्सा सांगितला. भर पावसातून घरी जात असताना दुचाकीने तिला धडक दिली. रिंकू सायकलवरुन खाली पडली. तिने नंतर जे काही केले ते ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

हा किस्सा सांगताना रिंकू म्हणाली, लहानपणी मला आठवतय, पावसाळा सुरु होता आणि तेव्हा मी सायकलवर शाळेत जायचे. शाळेतून घरी परत येताना एक टर्निंग पॉइंट आहे आणि गावाकडे तेव्हा काही सिग्नल वैगरे असं काही नसतं. भर पावसात मी येताना अशी दुचाकी आली आणि धडकली. मी खाली पडले. मला खरचलं, लागलं. तर मी उठले आणि दगड त्या गाडीवाल्याला फेकून मारला. मी म्हटलं मी पडले. तुला सॉरी पण नाही का म्हणता येत साधं.

पुढे रिंकू म्हणाली, मी सहावीत होते आणि त्याला म्हटलं मला एवढं लागलं आहे. मेडीकलचे पैसे दे. तेव्हा मी त्याच्याशी तसे भांडले होते. कारण माझं असं होतं की कमीत कमी येऊन मला उचलेले. वर धो धो पाऊस पडतोय. काहीच केलं नाही त्याने. मला प्रचंड दुखत होतं. तेव्हा मी भांडले होते.

शेवटी रिंकूने, माझं असं होतं की किमान मला उचल तरी, रक्त येतय ते पाहा. मी जाईन माझं. पण दया तरी दाखव. बाळ पडलय छोटं. तेव्हा मी त्याला थांबवलं होतं आणि भांडले होते. सध्या रिंकूचा आशा हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७ लाख रुपयांची कमाई केली आहे.