
नुकतीच दिवाळी झाली आहे. त्यामुळे सगळ्यांना वेध लागलेत ते हिवाळ्याचे... ऑक्टोबर हिटने त्रस्त झालेल्यांना गुलाबी थंडीमुळे हायसं वाटेल, अशी आशा असतानाच मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या.

मुंबईत अद्यापही थंडीची चाहूल लागलेली नाही. अजूनही वातावरणात प्रचंड उष्णता आहे. अशात रविवारच्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुंबईकरांना रस्ते ओले दिसले. त्यामुळे या पावसाच्या सरींमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय.

मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्री पाऊस झाला. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी अजूनही मेघागर्जनेसह पाऊस कोसळतोय.

मुंबईतील दादर, लोअर परळ, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.दरम्यान, राज्यात आणखी काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईकरांना अनपेक्षित असलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. पण या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे ऑक्टोबर हिटने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय.