
बीड | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. अशात कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

डॉ. प्रितम मुंडे या बीड या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 ला त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. आता बीडमधून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असतील? याची संभाव्य यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. यात बीडच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी प्रचंड चर्चा झाली. आता अजित पवार गट महायुतीत आल्याने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

प्रितम यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत एक वक्तव्य केलं होतं की, काहीही झालं तरी बहिणीला बाजूला करून मी पुढे जाणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.