
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह घड्याळ कुणाचं? याबाबतचा निकाल लागला आहे. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिलं आहे. त्यानंतर ठिकठिकाणी बॅनर लागल्याचं पाहायला मिळतंय.

शरद पवार यांच्या दिल्लीतील घराबाहेर बॅनर लावण्यात आले आहेत. जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा? असा मजकूर असणारे बॅनर पवारांच्या घराबाहेर लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाचे युवा नेते धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीतील शरद पवारांच्या घराबाहेर आज बॅनर लावून अजित पवारांच्या गटाला टोला लगावण्यात आला आहे.

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. शरद पवार हाच आमचा पक्ष अशी भूमिका बॅनर च्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

विक्रोळी पार्कसाईट इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नितीन देशमुख यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. कितीही संकटं आली तरी डगमगायचं नाही, कायम पवारांसोबत..., असं त्यांनी म्हटलं आहे.