Photos: पुण्यातील नोकरीच्या संधी सोडून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी यवतमाळमध्ये, युवाजोडप्याचा अभिनव ‘बालनगरी’ उपक्रम

- प्रणाली आणि धम्मानंद हे युवाजोडपं सध्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या समुहातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. या दोघांनीही नोकरी सोडून आयुष्यभर वंचित मुलांच्या शिक्षणावर काम करण्याचा निर्धार केलाय.
- हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते थेट यवतमाळमध्ये गेले आहेत. यवतमाळ जिल्हयातील काही गावांमध्ये त्यांनी बालशिक्षणावर काम करायला सुरुवात केली आहे.
- धम्मानंद गेली 6 वर्षांपासून तर प्रणाली 2 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. या अगोदर त्यांनी युनिसेफच्या प्रकल्पात काम करत या सर्व कामाचा तंत्रशुद्ध अनुभवही घेतलाय.
- मागील 2 महिन्यांपासून ते यवतमाळमधील धनगर आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. या समाजात शेतमजुरी आणि मेंढ्या पाळणं हेच कामाचं स्वरुप असल्याने संपूर्ण कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी आणि शेती कामासाठी कायम वेगवेगळ्या ठिकाणी पाल टाकून राहतं.
- हे ज्या गावात राहतात तिथून शाळा 2-3 किलोमीटर अंतरावर असते. सध्या ते ज्या गावात आहेत तेथे रस्तेही चांगले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते.
- सध्या हे जोडपं 3 ते 10 वर्षांच्या मुलांसोबत काम करत आहे. या लहान वयातील मुलांना पालक त्यांच्या कामासाठी घरी ठेऊन जाऊ शकत नाही. कारण मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उदभवतो. त्यामूळे ही मुलं पालकांसोबत शेतीवर आणि मेंढ्या चारायला दिवसभर जातात.
- परिणामी यांचं शिक्षण होऊ शकत नाही. पिढ्यान पिढ्या अशिक्षित असलेल्या या समूहाची पुढील पिढी ही अशीच शिक्षणापासून वंचित आणि शिक्षणाची ओढ नसलेली आहे.
- त्यामुळे या मुलांच्या दारात त्यांच्या कामाच्या वेळा सोडून आपण शिक्षण घेऊन पोचलो तर ही मुलं शिकू शकतील आणि त्यांच्यात आवड निर्माण करू शकू हा विचार घेऊन प्रणाली आणि धम्मानंद ‘बालनगरी’ हा उपक्रम चालवत आहेत.
- ते एक दिवसाआड रोज सायंकाळी 4 नंतर गावात जाऊन मुलांसोबत शैक्षणिक उपक्रम घेतात. सुरुवातीला मुलांना गोडी लागावी, मुलं आपल्यासोबत रमावी म्हणून फक्त गाणी, गोष्टी सांगत आहेत.
- आता मुलांना त्यांची आणि शिकण्याची आवड आणि सवय होऊ लागली आहे. त्यामुळे ते आले नाही तर मूलं त्यांची चातकासारखी वाट पाहतात. मुलांची आता पुस्तकाच्या जगाशी, चित्रांशी मैत्री होऊ लागलीय.
- मुलांना परिसरातील उपलब्ध साधनातून गणित, भाषा आणि कला असे उपक्रम घेतले जात आहेत. त्यांच्याकडे कामासाठी कोणतीही विशिष्ट अशी जागा नाही. उघड्यावर मिळेल अशा जागेत, फाटक्या आणि मळालेल्या कपड्यांमध्ये ही मुलं मातीत बसून शिक्षण घेत आहेत.
- आता या गावासोबत आणखी 9 गावांमध्ये आदिवासी मुलांसाठी या जोडप्याने बालनगरी हा आनंदाने शिकण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
- सध्या बिनपगारी स्वखर्चातून आणि मित्रपरिवारातून मिळणाऱ्या मदतीतून पुस्तके, साहित्य आणि साधने घेऊन हे काम सुरु आहे. ते लवकरच या कामाला संस्थात्मक रुप देणार असून त्यासाठी ‘ओवी’ हे नाव निश्चित करण्यात आलं आहे.
- मुलांच्या शिक्षणासोबत गावातील पालकांसाठी ओवी-समृद्ध पालकत्वाची हा उपक्रम देखील त्यांनी सुरु केलाय.
- त्यातून पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाविषयी जाणीव जागृती करणे, विविध विषयांवर पालकांच्या कार्यशाळा गावागावात घेणं हे काम सुरु आहे.















