
हिंदू धर्मात ईश्वराची उपासना करताना केवळ भक्तीच नाही, तर शुद्धता आणि शास्त्रोक्त नियमांना अत्यंत महत्त्व दिले जाते. दैनंदिन पूजेमध्ये आपण दिवा, तूप, फुले, चंदन, अक्षता आणि उदबत्ती यांसारख्या अनेक पवित्र सामग्रीचा वापर करतो.

मात्र, अनेकदा पूजेनंतर काही फुले किंवा इतर साहित्य शिल्लक राहते, अशा वेळी ते पुन्हा वापरता येते का? किंवा देवाच्या चरणी एकदा वाहिलेली वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतात.

त्यामुळे आज आपण देवाला वाहिलेले कोणते साहित्य पुन्हा वापरू शकतो आणि कोणते साहित्य विसर्जित करणे गरजेचे आहे, याचे साधे-सोपे नियम समजून घेणार आहोत.

पूजेमध्ये वापरण्यात येणारी चांदी, पितळ किंवा तांब्याची भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. याशिवाय देवघरातील मूर्ती, घंटा, शंख, जपमाळ आणि आसन यांसारख्या स्थायी वस्तूंचा पुनर्वापर करणे पूर्णतः योग्य आहे.

पण एकदा अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले, हार, कुंकू, धूप-दीप आणि अक्षता यांचा पुन्हा वापर करू नये. तसेच, देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये उरलेले तेल किंवा तूप दुसऱ्या वेळी वापरू नये. असे केल्याने त्या वस्तूंची पवित्रता नष्ट होते, असे मानले जाते.

शास्त्रात तुळशीच्या पानांना विशेष स्थान आहे. तुळशीची पाने कधीही शिळी किंवा अपवित्र मानली जात नाहीत. जर ताजी पाने उपलब्ध नसतील, तर अर्पण केलेली तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात.

त्याचप्रमाणे, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र देखील धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. शिवपुराणानुसार, बेलपत्र ६ महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही. मात्र, बेलपत्र फाटलेले किंवा डाग असलेले नसावे याची काळजी घ्यावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)