Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकर ‘शफक’ या नावानेही ओळखले जातात, नेमका अर्थ तरी काय?
Sachin Pilgaonkar: प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचे अजून एक नाव समोर आले आहे. आता या नावाचा अर्थ काय आहे? चला जाणून घेऊया...

सचिन पिळगांवकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि गायन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे एक टोपण नाव आहे 'शफक.' आता अनेकांना प्रश्न पडला आहे की याचा नेमका अर्थ काय आहे? स्वत: सचिन पिळगावकर यांनी हे सांगितले आहे.

सचिन पिळगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक कमीच लोकांना माहिती असलेली बाजू म्हणजे ते उत्कृष्ट गझलकारही आहेत. त्यांनी अनेक गझला लिहिल्या असून ‘शफक’ या टोपणनावाने त्यांची ओळख आहे.

अलिकडेच अल्ट्रा मराठीला दिलेल्या त्यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी ‘शफक’ शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता.

सचिन पिळगावकर म्हणाले होते की, “‘सचिन शफक’. शफक हा माझा तखल्लुस (टोपणनाव) आहे. शफक म्हणजे ट्वायलाइट – म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात पसरलेली लाली किंवा सूर्यास्तानंतर दिसणारी ती लाल चमक. त्या लालीलाच ‘शफक’ म्हणतात.”

याच मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी गझल लेखनाबद्दलही सांगितले. त्यांनी आतापर्यंत जवळपास १५ गझल लिहिल्या आहेत. सचिन पिळगांवकर यांना उर्दू भाषेची विशेष आवड आहे. अभिनेत्री मीनाकुमारी (मीनाआपा) यांच्याकडून त्यांनी उर्दू शिकले असल्याचे त्यांनी सांगितले होते.