
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या मालकीच्या 'भाने ग्रुप'ने मुंबईतील 'रिदम हाऊस' हे म्युझिक स्टोअर तब्बल 478.4 दशलक्ष रुपयांना (5.7 दशलक्ष डॉलर) विकत घेतलं आहे. 3600 चौरस फुटांचं हे रिदम हाऊस 2018 मध्ये बंद करण्यात आलं होतं.

फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेटचे मालक नीरव मोदीचं हे म्युझिक स्टोअर होतं. अब्जावधी डॉलर्सचं बँक कर्ज चुकवण्यात तो अपयशी ठरला होता. सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा 'भाने ग्रुप' हा विविध प्रकारचे कपडे बनवतो. या कंपनीकडून रिदम हाऊसच्या खरेदीच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

ही कंपनी आनंद अहुजाचे वडील हरीश अहुजा यांच्या मालकीची शाही एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची एक शाखा आहे आणि ती भारतातील सर्वांत मोठी पोशाख निर्मात्यांपैकी एक आहे. युनिकलो, डिकॅथलॉन आणि एच अँड एमसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही ती कपड्यांचा पुरवठा करते.

विनाइल, कॅसेट्स आणि कॉम्पॅक्ट डिस्कवर आपल्या आवडत्या कलाकारांना ऐकणाऱ्या संगीतप्रेमींच्या पिढीसाठी हा करार म्हणजे जणू एका युगाच्या समाप्तीचा संकेत आहे. 1940 च्या दशकात या रिदम हाऊसची स्थापना झाली होती.

रिदम हाऊसमध्ये एकेकाळी शास्त्रीय कलाकार पंडित रविशंकर, जेथ्रो टुलचे इयान अँडरसन आणि बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं. परंतु नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात म्युझिक पायरसी वाढल्याने आणि डिजिटल स्ट्रिमिंगच्या येण्याने रिदम हाऊसचं महत्त्व कमी झालं.