
कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळे गतविजेत्या आरसीबी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटक सरकारने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठकीत सामन्यांच्या आयोजनसाठी हिरवा कंदील दिला. सरकारने गेल्या वर्षी आयपीएल विजयाच्या जल्लोषानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे या स्टेडियममध्ये सामन्याच्या आयोजनावर बंदी घातली होती. (Photo Credit : PTI)

मंत्रिमंडळाने कुन्हा समितीच्या रिपोर्टमधील काही अटी-शर्थींसह सहमती दर्शवल्याचं मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितलं. त्यामुळे आता आरसीबीला त्या अटी-शर्थी मान्य असल्यास चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात येऊ शकतात. इतकंच नाही तर ओपनिंग सेरेमनीचं (रंगारंग कार्यक्रम) आयोजन केलं जाऊ शकतं. (Photo Credit : PTI)

कुन्हा समितीच्या अहवालानुसार, एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 35 हजार क्रिकेट चाहत्यांनाच प्रवेश देता येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने एआय कॅमेरे, अद्ययावत गेट सिस्टम, पोलीस यंत्रणा आणि नियमांचं पालन करावं लागेल. क्रिकेट असोसिएशनकडून या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते की नाही? याकडे गृहमंत्रालयाची बारीक नजर असणार आहे. (Photo Credit : PTI)

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अर्थात केएसीए आणि आरसीबीकडून राज्य सरकारकडे या मैदानात सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी मागण्यात आली होती. आता राज्य सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे आता केएसीए या अटी शर्थींची पूर्तता करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

दरम्यान आयपीएलच्या 19 व्या मोसमााठी (IPL 2026) आता काहीच आठवडे बाकी आहेत. मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना या आगामी मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले आहेत. (Photo Credit : PTI)