
आयपीएल स्पर्धेच्या 18व्या पर्वात पाच संघाच्या सहा कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे. या सहा कर्णधारांना स्लो ओव्हर रेटची चूक भोवली आहे. आयपीएल नियमानुसार, प्रत्येक संघाला 1 तास 30 मिनिटात 20 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 20 षटकं वेळेत पूर्ण केली नाहीत तर संघाच्या कर्णधाराला दंड आकारला जातो. प्रत्येकी 12 लाखांचा दंड आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे सुरुवातीच्या सामन्यांचे नेतृत्व रियान परागने केलं. त्यानंतर आता संजू सॅमसनकडे धुरा आहे. दोघांनीही स्लो ओव्हर रेटची चूक केली. त्यामुळे पाच संघांमधील एकूण सहा कर्णधारांना दंड बसला आहे. चला जाणून घेऊयात दंड भरणारे कर्णधार कोण होते.

अक्षर पटेल: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. या चुकीमुळे कर्णधार अक्षर पटेलला 12 लाखांचा दंड ठोठावला.

हार्दिक पंड्या: 30 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने संथ गतीने गोलंदाजी केली होती.

रियान पराग: संजू सॅमसनच्या जागी राजस्थान रॉयल्सचे तीन सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या रियान परागलाही दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर-रेट चूक केल्याबद्दल परागला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऋषभ पंत: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण न केल्याबद्दल पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

रजत पाटिदार: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटिदारला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संजू सॅमसन: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही संजू सॅमसनने दिलेल्या वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. पण संजू सॅमसनला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली एकदा चूक झाली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा चूक झाल्याने 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.