
हिंदी पॉप म्युझिक विश्वात 'युफोरिया' या बँडचं नाव ऐकताच अनेक गोड आठवणी ताज्या होतात. नव्वदच्या दशकात जेव्हा पॉप म्युझिकचा काळ सुरू झाला, तेव्हा डॉक्टरपासून गायक बनलेल्या पलाश सेनने त्याच्या बँडसह इंडी-पॉपला एक नवीन चेहरा दिला.

मायरी, धूम पिचक धूम, औना जाऊना, फिर धूम यांसारखे त्याचे अल्बम्स तुफान गाजले. आजसुद्धा ही गाणी लोकप्रिय आहेत. पालश सेनचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु त्याच्याशी संबंधित एक किस्सा फार क्वचित लोकांना माहीत असेल.

मंचावर परफॉर्म करताना पलाश त्याच्या गळ्यात आईचं मंगळसूत्र घालतो. यामागचं कारण भावूक करणारं आहे. पलाशची आई डॉ. पुष्पा सेन या फक्त आठ वर्षांच्या असताना देशाची फाळणी झाली. त्यांनी डॉक्टर बनून समाजाची सेवा केली आणि मुलालाही तेच संस्कार दिले.

पलाशने एका मुलाखतीत सांगितलं की वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने गळ्यातील मंगळसूत्र काढलं होतं. त्याच क्षणी त्याला जाणीव झाली की मंगळसूत्र हा फक्त दागिना नाही तर त्यात एका आईचा संघर्ष, प्रेम आणि आशीर्वाद दडलेला आहे.

तेव्हाच पलाशने मंचावर परफॉर्म करताना आईचं मंगळसूत्र घालण्याचं ठरवलं होतं. प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक सुरात आईचा आशीर्वाद सोबत राहावा, या त्यामागचा त्याचा विचार होता.