
मालदीवला भारताशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. आता मालदीवच्या पर्यटन मंत्रालयकडून डाटा समोर आला आहे. त्यानुसार भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या मागील वर्षांपेक्षा 33 टक्क्यांनी कमी झाली आहे.

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयनुसार 2023 मध्ये 4 मार्च 2023 पर्यंत 41,054 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले होते. 2 मार्च 2024 पर्यंत त्या पर्यटकांची संख्या 27,224 वर आली आहे. मागील वर्षापेक्षा ही संख्या 13,830 कमी झाली आहे.

2023 मध्ये मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मालदीवमध्ये जाणाऱ्या एकूण पर्यंटकांपैकी 10 टक्के पर्यटक भारतीय होते. आता भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मालदीवमधील पर्यटन बाजारपेठेतील भारताचा वाटा 6 टक्क्यांनी घसरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीपला गेले होते. त्याने लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोदींनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड झाला. लोक लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करत होते.

मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील लोकांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. भारतीय लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

भारतीयांच्या बहिष्कारामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.