
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. कल्याणमध्ये एका संशोधक-कलावंताने आपल्या कलेतून महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे.

कल्याण पश्चिम येथील रहिवासी डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी तब्बल ४२२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावांचा वापर करून शिवछत्रपतींचे एक भव्य आणि तेजोमय पोर्ट्रेट साकारले आहे. इतिहास, कला आणि संशोधनाचा हा त्रिवेणी संगम सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

या कलाकृतीमागे एक विशेष प्रेरणा दडलेली आहे. मागील वर्षी शिवकालीन १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून (UNESCO) जागतिक वारसा नामांकनासाठी विचारात घेण्यात आले होते.

या ऐतिहासिक घटनेने भारावून जाऊन डॉ. गुप्ता यांनी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एकाच चित्रात गुंफण्याचा संकल्प केला. भावी पिढीला महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती व्हावी आणि हा जिवंत इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

हे पोर्ट्रेट साकारणे डॉ. दिनेश गुप्ता यांच्यासाठी मोठे आव्हान होते. ४२२ किल्ल्यांची अचूक नावे शोधणे, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ तपासणे आणि त्या नावांना महाराजांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत कलात्मकरीत्या बसवणे यासाठी त्यांनी सलग दोन दिवस परिश्रम घेतले.

या चित्रातील प्रत्येक अक्षर इतिहासाची साक्ष देत असून, महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वात हे किल्ले जणू विलीन झाल्याचा भास होतो. यापूर्वीही डॉ. गुप्ता यांनी विविध संशोधनात्मक कलाकृती सादर केल्या आहेत.

मात्र ४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारलेले हे पोर्ट्रेट त्यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानले जात आहे. ही कलाकृती केवळ एक चित्र नसून तो राष्ट्रप्रेरणेचा एक प्रभावी दस्तऐवज ठरला आहे.

कल्याणसह संपूर्ण परिसरात या कलाकृतीची आणि डॉ. गुप्ता यांच्या कल्पकतेची जोरदार चर्चा होत आहे.