घरात पाण्याचे भांडे किंवा माठ कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तू शास्त्राचे नियम काय सांगतात?
वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्याचे भांडे किंवा माठ योग्य दिशेला ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते. जाणून घ्या मातीचे भांडे ठेवण्यासाठी कोणती दिशा सर्वोत्तम मानली जाते आणि त्याचे काय फायदे आहेत.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक निश्चित दिशा ठरलेली असते. त्याचप्रमाणे घरात पाण्याचे भांडे किंवा माठ योग्य दिशेला ठेवल्यास सुख-समृद्धी वाढते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही उत्तम राहते. त्यानुसार पाण्याचे भांडे किंवा माठ कुठे आणि कसा ठेवावा, याबद्दल सविस्तर नियम आहेत.

पाण्यासाठी सर्वात उत्तम दिशा ही उत्तर दिशा मानली जाते. उत्तर दिशा ही जलतत्त्वाची आणि धनदेवता कुबेराची मानली जाते. या दिशेला पाण्याचा माठ किंवा फिल्टर ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक चणचण भासत नाही.

ईशान्य कोपरा या कोपऱ्याला देवघर किंवा पवित्र स्थान मानले जाते. येथे पाण्याचे भांडे ठेवल्याने घरात मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. उत्तर किंवा ईशान्येत जागा नसल्यास पूर्व दिशेलाही पाण्याचे भांडे ठेवता येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

दक्षिण दिशा ही यमाची आणि अग्नी तत्त्वाची मानली जाते. या दिशेला पाण्याचे भांडे ठेवल्यास घरात विनाकारण वाद निर्माण होतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नैऋत्य कोपरा आणि आग्नेय कोपरा हा अग्नीचा (किचनचा ओटा) असल्याने तेथे अगदी जवळ पाणी ठेवू नये. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो.

पाण्याचे भांडे किंवा माठ कधीही पूर्णपणे रिकामा ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी तो पाण्याने भरलेला असावा, यामुळे घरात समृद्धी टिकून राहते. वास्तूचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी पाण्याचे भांडे रोज नियमितपणे स्वच्छ धुवून त्यात ताजे पाणी भरावे. शिळे पाणी जास्त वेळ साठवून ठेवू नये.

मातीमध्ये नैसर्गिक शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने कुंडलीतील बुध आणि चंद्राची स्थिती मजबूत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. (टीप: येथे दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा, ज्योतिषशास्त्र आणि सर्वसामान्य मान्यांवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.)