
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले.

गोळीबाराचा आवाज येताच बाहेरुनही दोन्ही गटातील कार्यकर्ते धावून आत आल्याचे दिसत आहे. त्यानंतर महेश गायकवाड आणि इतरांना मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी कोणताही वाद होताना दिसत नाही. परंतु अचानक गणपत गायकवाड उठताना दिसत आहे आणि गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच हाणामारी करताना दिसत आहे. कॅबिनमधील मिळेल ती वस्तू घेऊन दुसऱ्यावर हल्ला केला जात आहे. या प्रकारामुळे कल्याण, डोंबिवलीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

महेश गायकवाड याला जीवे मारण्यासाठी आधीच कट रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर कट रचण्याचे कलम लावले आहे. हा सर्व प्रकार गणपत गायकवाड यांची अडचण वाढवणारा ठरणार आहे.