बॉलिवूडमध्ये खळबळ उडवणारं आशा भोसले यांचं वादग्रस्त गाणं, वादानंतरही ठरलं सुपरहिट
54 वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या प्रसिद्ध गाण्यावर घालण्यात आली होती बंदी, टीव्हीवर चित्रपट दाखवताना गाणं काढून टाकण्यात आलं. मात्र, प्रेक्षकांना ते गाणं इतकं आवडलं की आजही चाहते वेळ काढून ते गाणं ऐकतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत आजकाल गाण्यांचे बोल आणि त्यामागचा अर्थ बऱ्याचदा वेगळ्या दिशेने जाताना दिसतो आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा गाण्यांना एक वेगळीच ओळख होती. त्या काळातील गाणी लागली की लोक अक्षरशः त्यात हरवून जात असत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांसारख्या दिग्गजांच्या गाण्यांना आजही कोट्यवधी चाहते आहेत. त्याच काळात आशा भोसले यांची गाणीही तितकीच गाजली. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील काही गाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

एकीकडे लता मंगेशकर विक्रम करत होत्या तर दुसरीकडे त्यांची बहीण आशा भोसले आपल्या अनोख्या शैलीतून श्रोत्यांची मने जिंकत होत्या. आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने बोल्ड आणि रोमँटिक गाण्यांना आवाज दिला. जरी त्यांनी भावपूर्ण आणि सॉफ्ट गाणीही गायली तरी त्यांच्या बोल्ड गाण्यांचीच जास्त चर्चा झाली.

1971 साली प्रदर्शित झालेल्या हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील दम मारो दम हे गाणं विशेष चर्चेत आलं. या गाण्यात जीनत अमान यांची भूमिका होती. या गाण्यावर चिलम-गांजा ओढण्यासारख्या व्यसनांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच ग्लॅमरचा वापर करून संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचेही टीकाकारांनी म्हटले. हा वाद इतका वाढला की रेडिओवर या गाण्यावर बंदी घालण्यात आली आणि दूरदर्शनवर चित्रपट दाखवताना हे गाणं काढून टाकण्यात आलं.

वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आशा भोसले यांचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. आजही हे गाणं श्रोत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून आहे. यावरून त्या काळातील संगीताची ताकद आणि आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आजही कायम असल्याचे दिसून येते.