
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींच्या लव्ह-स्टोरी कधीच जुन्या होत नाहीत. जरी त्यांची लव्ह-स्टोरी पूर्ण होऊ शकली नसली तरी त्यांच्याबद्दलच्या अनेक कहाण्या आजही सांगितल्या जातात. अशीच एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांचं नातं कशामुळे तुटलं होतं, याचा खुलासा आता रेखा यांच्याच एका जवळच्या मैत्रिणीने केला आहे.

रेखा यांची अत्यंत जवळची मैत्रीण बीना रमाणी त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाल्या, "त्यावेळी रेखाला अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली द्यावी असं वाटत होतं. आपलं नातं लपून राहू नये आणि त्याबद्दल सर्वांना कळावं, अशी तिची इच्छा होती. परंतु असं होऊ शकलं नाही. कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते आणि राजकारणात सक्रिय होऊ पाहत होते."

बीना रमाणी यांनी रेखा यांच्या बालपणाबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दलही मोकळेपणे सांगितलं. अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या अनौरस मूल म्हणून जन्मलेल्या रेखा या स्थिर कुटुंबरचनेशिवाय वाढल्या. या गोष्टींचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बीना रमाणी म्हणाल्या, "रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्यात एक निरागसता होती. जर तिने तिच्या आयुष्यात कधी काही चूक केली असेल तर ती फक्त तिच्या निरागसतेमुळेच असेल. तिच्या बालपणाचा तिच्यावर काही प्रमाणात परिणाम झाला. तिला पालकांकडून प्रेमाची कमतरता जाणवत होती. त्यातच तिने 13-14 व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला बालपण पूर्णपणे जगण्याची संधीच कधी मिळाली नाही."

अमिताभ बच्चन जेव्हा राजकारणात आले, तेव्हा परिस्थिती बदलली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं कधीच सार्वजनिकरित्या मान्य केलं जाणार नाही, हे रेखा यांना समजणं कठीण होतं, असं मत बीना यांनी मांडलं.

"अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले होते. रेखा मला भेटायला न्यूयॉर्कला आली होती. त्यावेळी ती कठीण काळातून जात होती. कारण अमिताभ बच्चन यांनी कदाचित तिला सांगितलं होतं की त्यांचं नातं कधीही जगजाहीर होणार नाही", असं त्या पुढे म्हणाल्या.

अमिताभ आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री 'सिलसिला' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय इतरही काही चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. यामध्ये 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'दो अंजाने', 'राम बलराम' यांचा समावेश होता.