
आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यावर अनेकदा पाहतो की, ट्रेन थांबलेली असताना किंवा सुटायला वेळ असला तरीदेखील रेल्वेचे इंजिन सतत सुरूच असतं. असं का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आज आपण यामागचे नेमके कारण समजून घेणार आहोत.

डिझेलवर चालणाऱ्या या रेल्वे इंजिनाला बंद का केलं जात नाही? यामागे काही महत्त्वाची कारणं आज आपण समजून घेणार आहोत. जेव्हा ट्रेन शेवटच्या स्थानकावर येते आणि थांबते, त्यावेळी तुम्हाला गॅस सोडल्यासारखा आवाज येतो. हा आवाज ट्रेन थांबल्यावर इंजिनच्या ब्रेक प्रेशरच्या रिलीजचा असतो.

हे प्रेशर पुन्हा तयार व्हायला वेळ लागतो. ट्रेनला थांबवण्यासाठी एका विशिष्ट दाबाची गरज असते. जेव्हा इंजिन बंद केले जाते, तेव्हा हे प्रेशर कमी होतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबलेल्या ट्रेनचं इंजिन सुरू ठेवणं आवश्यक असतं.

डिझेल इंजिनची सिस्टीम खूप किचकट असते. हे मोठं युनिट असतं, ज्यात 16 सिलेंडरचं इंजिन असतं. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लगसारखं बाहेरील इग्निशन एजंट असतं, पण डिझेल इंजिन कंप्रेशन इग्निशनवर काम करतं.

त्यामुळे जेव्हा डिझेल इंजिन सुरू केलं जातं, तेव्हा त्याला ऑप्टिमल वर्किंग टेम्प्रेचरची गरज असते. जे हवा आणि इंधनाच्या कंप्रेशनमुळे तयार होतं. इंजिन पूर्णपणे थंड झाल्यावर ते पुन्हा सुरू करण्यासाठी जास्त वेळ आणि ऊर्जा लागते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज भासते. दुसरीकडे, स्टेशनवर उभं असतानाही इंजिन सुरू असल्यामुळे इंधनाचा वापर होत राहतो.


इंधनाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता हळूहळू डिझेल इंजिन बंद केले जात आहेत. आता या जागी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर वाढत आहे.

म्हणूनच रेल्वे स्टेशनवर थांबलेली ट्रेन आणि तिचं इंजिन सुरू असण्यामागे ही सर्व कारण आहे. ही कारणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. भविष्यात मात्र, इलेक्ट्रिक इंजिनच्या वाढत्या वापरामुळे हे चित्र बदलू शकतं.